बॉर्डर-गावसकर मालिकेत भारतीय गोलंदाजानं आतापर्यंत आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळेच ३५ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाला एकाच कसोटी मालिकेत चार वेगवेगळ्या सलामी फलंदाजांना उतरवण्यास भाग पाडलं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेड आणि जो बर्न्स यांनी सलामीवीराची भूमिका पार पाडली होती. मात्र, भारतीय गोलंदाजीपुढे त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आलं. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं डेव्हिड वॉर्नर आणि विल पुकोवस्की यांना सलामीसाठी उतरवलं.
आणखी वाचा- IND vs AUS : राष्ट्रगीत सुरु असताना सिराजला कोसळलं रडू, पाहा व्हिडीओ
विल पुकोवस्कीनं ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण केलं तर डेव्हिड वॉर्नरनं दुखापतीनंतर संघात पुनरागमन केलं आहे. एकदिवसीय कसोटी मालिकेत वॉर्नरला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यानं टी-२० आणि पहिल्या दोन कसोटी सामन्यातून माघार घेतली होती. आता तिसऱ्या कसोटीत पुनरागमन करणाऱ्या वॉर्नरला सिराजनं माघारी धाडलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या सलामी फलंदाजाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
आणखी वाचा- IND vs AUS: भारताचा नवदीप सैनी पडला ऑस्ट्रेलियाच्या पुकोव्हस्कीवर भारी, कारण…
ऑस्ट्रेलियाने १९८५-८६ मध्ये न्यूझीलंडविरोधातील एकाच मालिकेत चार सलामी फलंदाजांचा वापर केला होता. पर्थ कसोटीत एण्ड्रयू हिल्डिच आणि कॅप्लर व्हेसेल्स यांनी डावाची सुरुवात केली होती. तर सिडनी कसोटीत रोबी केर आणि वेन फिलिप्स यांनी सलामीविराची भूमिका पार पाडली होती. त्यानंतर आता तब्बल ३५ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावर ही नामुष्की ओढावली आहे.
आणखी वाचा- अजिंक्यच्या नेतृत्वात ‘या’ १० खेळाडूंनी केले पदार्पण; नावं जाणून व्हाल चकीत
बॉर्डर-गावसकर मालिकेतील अॅडिलेड येथील पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं विजय मिळवत मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. आता तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत मालिका जिंकण्याचा इराद्यानं दोन्ही संघ उतरतील.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 7, 2021 9:19 am