भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेतील निर्णायक सामना शुक्रवारी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडीयमवर रंगणार आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट आहे. हैदराबादमध्ये पावसाचा लपंडाव सुरु असून, याचा परिणाम तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यावर पडू शकतो. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द होऊ नये, यासाठी पिच क्युरेटर वाय. एल चंद्रशेखर मेहनत घेत आहेत.

बीसीसीआयने या सामन्यात खेळपट्टीची संपूर्ण जबाबदारी ही झोनल क्युरेटर श्री राम यांच्याकडे सोपवली आहे. श्रीराम यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये निर्णायक सामना खेळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, पावसामुळे सध्या आऊट फिल्डवर थोडा परिणाम झाला आहे. याव्यतिरिक्त कोणतीही मोठी समस्या सध्याच्या घडीला नाही. सामन्याच्या दिवशी थोडाफार पाऊस झाला तरी ते मैदान खेळण्यासाठी सज्ज करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि अखेरचा सामना उद्या खेळवण्यात येणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ प्रत्येकी एक-एक सामना जिंकून मालिकेत बरोबरीवर आहेत. अखेरचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरतील. यापूर्वी एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला ४-१ असा शह दिला. याच आत्मविश्वासाच्या जोरावर भारतीय संघ टी-२० मालिका जिंकून आयसीसी क्रमवारीतील स्थान सुधारण्यासाठी प्रयत्नशील असेल. तर दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर कांगारुंचा आत्मविश्वासही दुणावला आहे. मालिकेतील शेवटचा सामना जिंकून एकदिवसीय मालिकेतील पराभवाची परतफेड करण्याची ऑस्ट्रेलियाकडे संधी आहे. अर्थातच हैदराबादच्या मैदानात पावसाने हजेरी लावली नाही, तर दोन्ही संघात चुरशीचा सामना पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.