दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांना चीतपट केल्यानंतर भारतीय संघासाठी ऑस्ट्रेलियाचे आव्हान सोपे असेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र पुण्यात अवघ्या अडीच दिवसांत ऑस्ट्रेलियासमोर भारतीय संघाचे पानिपत झाले. पुन्हा अशी सुमार कामगिरी होणार नाही अशी हमी भारतीय संघाचा कर्णधार  विराट कोहलीने दिली आहे.

‘आमच्याकडून पुन्हा अशी वाईट कामगिरी होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. पराभवांचा स्वीकार करणे आवश्यक असते. पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियाने सर्वसमावेशक खेळ करत आम्हाला निष्प्रभ केले. भारतीय खेळाडू जिंकण्यासाठीच्या विजीगीषु वृत्ती दाखवण्यात कमी पडले. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी प्रत्येक टप्प्यावर खेळ उंचावला. पुण्यातल्या पहिल्या कसोटीत पराभव झाला म्हणजे आम्ही मालिका गमावली असा अर्थ होत नाही. तो सामूहिक पराभव होता. पहिल्या कसोटीतील चुकांतून बोध घेत पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न असेल. काहीवेळेला पराभव झाल्याने पुनरावलोकन करता येते. त्रुटींवर काम करण्याची संधी मिळते’, असे कोहलीने सांगितले. हारजीत काहीही झाले तरी आम्ही त्यातून शिकत असतो. बंगळुरू कसोटीसाठी आम्ही कसून सराव केला आहे. संघाची संरचना कशी असेल यावर आम्ही विचार केला आहे. मात्र नाणेफेकीवेळीच अंतिम संघ जाहीर केला जाईल असे कोहलीने स्पष्ट केले. खांद्याच्या दुखापतीमुळे हार्दिक पंडय़ा संघनिवडीसाठी उपलब्ध नसेल असे कोहलीने सांगितले.

स्टीव्हन स्मिथ हे आमचे उद्दिष्ट नाही. ऑस्ट्रेलिया संघातील प्रत्येक खेळाडू महत्वाचा आहे. त्यानुसार आम्ही रणनीती आखली आहे. कसोटी जिंकण्यासाठी १० विकेट्स मिळवणे आवश्यक असते. ते कौशल्य घोटीव करण्यावर आमचा भर असेल असे त्याने पुढे सांगितले.

पुण्याचा विजय इतिहासजमा -स्मिथ

बंगळुरू : पुणे कसोटीत सर्वागीण खेळ करत आम्ही भारतीय संघाविरुद्ध दिमाखदार विजय साकारला. मात्र तो सामना आता इतिहास झाला असून, बंगळुरू कसोटीसाठी आम्ही सज्ज झालो आहोत असे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने व्यक्त केले.

‘भारतीय संघाने इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, बांगलादेश अशा संघांना नमवत मालिका विजय साकारले होते. आमचा संघ अनुनभवी होता. आम्ही जिंकू शकतो अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. भारतीय संघाविरुद्ध भारतात खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते. मात्र संघातील प्रत्येकाने परिस्थितीशी जुळवून घेतले. म्हणूनच संस्मरणीय विजय साकारू शकलो मात्र त्या विजयाचे कौतुक करत राहण्यात अर्थ नाही’, असे स्मिथ म्हणाला. तो पुढे म्हणाला, ‘भारतीय संघ दमदार पुनरागमन करेल याची आम्हाला जाणीव आहे. हे आक्रमण रोखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पहिला डाव निर्णायक असणार आहे. अधिकाअधिक वेळ फलंदाजी करणे आवश्यक आहे. पुण्यात अडीचशे धावा पुरेशा ठरल्या. मात्र आता तशी परिस्थिती नाही. बंगळुरूच्या खेळपट्टीवर तिसऱ्या दिवसापासून खेळपट्टी फिरकीला साथ देण्याची शक्यता आहे. यामुळे पहिल्या डावात सर्वाधिक धावा करणे अत्यावश्यक आहे. पुण्यातील खेळपट्टीविषयी आमची कोणतीही तक्रार नाही. दोन्ही संघांना एकाच खेळपट्टीवर खेळायचे होते’.

 

न्यूझीलंड संघात नीशाम, पटेलचा समावेश

वेलिंग्टन : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन कसोटी क्रिकेट मालिकेसाठी न्यूझीलंडने फिरकी गोलंदाजीवर भिस्त ठेवली आहे. पुढील आठवडय़ात होणाऱ्या या मालिकेसाठी तेरा खेळाडूंच्या संघात जितेन पटेल या फिरकी गोलंदाजास पाचारण करण्यात आले आहे.

या दोन संघांमधील पहिला सामना बुधवारी डय़ुनेडिन येथे सुरू होत आहे. त्यानंतर वेलिंग्टन व हॅमिल्टन येथे अनुक्रमे दुसरा व तिसरा कसोटी सामना होणार आहे. द्रुतगती गोलंदाज मॅट हेन्री व फलंदाज डीन ब्राऊनी यांच्याऐवजी पटेल व अष्टपैलू खेळाडू जिमी नीशाम यांना न्यूझीलंड संघात स्थान मिळाले आहे.

न्यूझीलंड

केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेन्ट बोल्ट, कॉलीन डी ग्रँधोमी, टॉम लाथम, जिमी नीशाम, हेन्री निकोल्स, जीतेन पटेल, जीत रावळ, मिचेल सँन्टेर, टीम साऊथी, रॉस टेलर, नील वॉग्नर, ब्रॅडली जॉन वॉटलींग.