News Flash

पुनरागमनाची ‘खेळ’पट्टी तय्यार

कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता

| March 4, 2017 03:00 am

भारत-ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी आजपासून बंगळूरुत; कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता

दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि बांगलादेश यांना निष्प्रभ केल्यानंतर भारतीय संघाचा विजयरथ ऑस्ट्रेलियावर चाल करण्यासाठी सज्ज होता. त्यासाठी पुण्यनगरीत फिरकीला अनुकूल खेळपट्टी तयार करण्यात आली. मात्र या दौऱ्यासाठी चोख अभ्यास करून आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने हे डावपेच भारतीय संघावर उलटवत दणदणीत विजय साजरा केला. या विजयानिशी आत्मविश्वास उंचावलेला ऑस्ट्रेलियाचा संघ बंगळूरुतील आव्हानासाठी सज्ज झाला आहे.

यंदाच्या हंगामात भारतीय संघ सातत्याने जिंकतो आहे. अननुभवी ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून चीतपट झाल्यानंतर भारतीय संघ सावध झाला आहे. खेळपट्टी आणि प्रतिस्पर्धी दोघांनाही कमी लेखून चालणार नाही याची जाणीव भारतीय संघाला झाली आहे. मूलभूत कौशल्ये घोटून घेत विजयपथावर परतण्यासाठी भारतीय संघ आतुर आहे. मानहानिकारक पराभवाच्या आठवणी बाजूला सारण्यासाठी भारतीय संघाने प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्वतराजीचाही आनंद घेतला.

०-१ असे पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाला गार्डन सिटी अर्थात बेंगळूरुत सरशी साधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. मुरली विजय वैयक्तिक पातळीवर सातत्याने धावा करत आहे. मात्र लोकेश राहुलच्या जोडीने भक्कम सलामी देण्याचे आव्हान त्याच्यासमोर आहे. सातत्याचा अभाव, तंदुरुस्ती या मुद्दय़ांवर राहुलला बळकट व्हावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेंगळूरुत पदार्पण करणाऱ्या चेतेश्वर पुजाराकडून संयमी खेळीची अपेक्षा आहे. मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूडच्या झंझावाती माऱ्याला सामोरे जाण्याचे आव्हान पुजारासमोर आहे. यंदाच्या हंगामात चार सलग कसोटी मालिकांमध्ये चार द्विशतके झळकावण्याचा विक्रम कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीने धावांची टांकसाळच उघडली होती. या मुद्दय़ांमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ कोहलीच्या तंत्राचा अभ्यास करून आला आहे. कोहलीला रोखल्यास भारतीय संघ कोलमडतो हे ध्यानात घेऊन ऑस्ट्रेलियाच्या संघाने रणनीती आखली आहे. त्रिशतकवीर करुण नायरला डावलून अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पुण्यात अजिंक्य झटपट माघारी परतला होता. गेल्या दहा डावांत अजिंक्यला केवळ अर्धशतक झळकावता आले आहे. प्रशिक्षक कुंबळे आणि कर्णधार कोहली यांचा पूर्ण पाठिंबा रहाणेला आहे. मात्र विदेशाप्रमाणे घरच्या खेळपट्टीवर मोठी खेळी करत संघातील स्थान कायम राखण्याची जबाबदारी रहाणेवर आहे. वृद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्याकडून उपयुक्त योगदानाची अपेक्षा आहे.

पाच गोलंदाजासह खेळण्यावर कोहलीचा विश्वास आहे. दोन वेगवान आणि तीन फिरकी गोलंदाजांसह खेळण्याचे धोरण बेंगळूरुत कायम राहणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. जयंत यादवऐवजी करुण नायरला संधी मिळू शकते. इशांत शर्माच्या जागी भुवनेश्वर कुमारचा समावेश होऊ शकतो. डावखुरा फिरकीपटू स्टीव्हन ओ कफीचे यश लक्षात घेता भारतीय संघ कुलदीप यादवला पदार्पणाची संधी देऊ शकतो.

ऑस्ट्रेलियाच्या संघाची भिस्त डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ यांच्या खांद्यावर आहे. या दोघांपैकी एकाला मोठी खेळी करावी लागणार आहे. मॅट रेनशॉने पुण्यात आपले कर्तृत्व सिद्ध केले होते. शॉन मार्शचा अनुभव ऑस्ट्रेलियासाठी जमेची बाजू आहे. मिचेल मार्श का ग्लेन मॅक्सवेल याचा निर्णय घेणे ऑस्ट्रेलियासाठी कठीण असेल. मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड ही वेगवान गोलंदाजांची जोडगोळी भारतासाठी डोकेदुखी आहे. त्याच वेळी नॅथन लियॉन आणि स्टीव्हन ओ कफी यांचा सामना करणे भारतासाठी आव्हान असेल.

खेळपट्टी

पुण्यात अडीच दिवसांत मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर बेंगळूरुत खेळपट्टी हा संवेदनशील मुद्दा ठरला आहे. पुण्याच्या तुलनेत या खेळपट्टीवर फलंदाजांना साहाय्य मिळेल अशी आशा आहे. तिसऱ्या दिवसापासून खेळपट्टीवर चेंडू वळू लागेल अशी चिन्हे आहेत. गहुंजेच्या खेळपट्टीवर भारतीय संघ फिरकीच्या चक्रव्यूहात सापडला होता. बेंगळूरुत खेळपट्टीवर गवत ठेवायचे की नाही याबाबत मतमतांतरे आहेत.

संघ

  • भारत : लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, उमेश यादव, इशांत शर्मा, अभिनव मुकुंद, करुण नायर, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंडय़ा, कुलदीप यादव.
  • ऑस्ट्रेलिया : मॅट रेनशॉ, डेव्हिड वॉर्नर, शॉन मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), पीटर हॅण्ड्सकॉम्ब, मिचेल मार्श, मॅथ्यू वेड, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड, स्टीव्हन ओ कफी, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्वेपसन, उस्मान ख्वाजा, जॅक्सन बर्ड आणि अ‍ॅश्टॉन अगर.

वेळ  : सकाळी ९.३० वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर

आकडेवारी : बेंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर कामगिरी

  • भारत-५
  • ऑस्ट्रेलिया-३
  • अनिर्णित-२
  • निकाल नाही-१
  • एकूण-११

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 3:00 am

Web Title: india vs australia virat kohli steve smith 5
Next Stories
1 पुण्यासारखे पानिपत पुन्हा नाही- कोहली
2 जोकोव्हिचचा धक्कादायक पराभव
3 वेगवान कोलमन..
Just Now!
X