पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा दारुण पराभव केला. अॅडिलेड येथील ओव्हल मैदानावर झालेल्या दिवसरात्र सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ८ गड्यांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय संघानं कसोटीतील निच्चांकी धावसंख्या नोंदवली आहे. त्याबरोबर अनेक विक्रमाही मोडीत निघाले. या सामन्यात एकप्रकारे भारतीय संघाच्या नशीबानेही साथ सोडल्याचं चित्र आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आतापर्यंत नाणेफक जिंकल्यानंतर एकही कसोटी सामना गमावला नव्हता. पण या कसोटीत विराट कोहलीला पराभवचा सामना करावा लागला आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीनं नाणेफक जिंकल्यानंतर भारतीय संघ सामना जिंकणार, असा कयास चाहत्यांनी लगावला होता. त्याला कारणही तसेच होतं. विराट कोहलीनं कसोटी कर्णधारपद स्वीकारल्यानंतर आतापर्यंत जेव्हा जेव्हा नाणेफक जिंकली तेव्हा तेव्हा सामनाही जिंकला होता. मात्र, २०२० वर्षात विराटचा हा विक्रमही मोडीत निघाला आहे. नाणेफक जिंकल्यानंतर विराट कोहलीला पहिल्यांदाच सामना गमावावा लागला आहे. विराट कोहलीनं आतापर्यंत २६ कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. त्यापैकी २१ मध्ये विजय मिळवला आहे. चार कसोटी सामने ड्रॉ झाले आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच विराट कोहलीला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

८ गडी राखून भारतावर मात करत ऑस्ट्रेलियाने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक माऱ्यापुढे भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत संपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताने आपली निच्चांकी धावसंख्याही यादरम्यान नोंदवली. विजयासाठी मिळालेलं ९० धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सहज पूर्ण केलं. मॅथ्यू वेड आणि बर्न्स यांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाची पायाभरणी केली. जो बर्न्सने नाबाद ५१ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.