२२ नोव्हेंबरला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगणार आहे. सौरव गांगुलीने बीसीसीआयची सुत्र हाती घेतल्यानंतर संघटनेमध्ये महत्वाचे बदल होताना दिसत आहेत. या महत्वाच्या सामन्यासाठी, प्रक्षेपण करणारी वाहिनी Star Sports महेंद्रसिंह धोनीला समालोचनासाठी आमंत्रित करण्याच्या विचारात आहे. IANS वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

पहिल्या दोन दिवसांसाठी धोनीला समालोचनासाठी बोलवण्याचा विचार असून यादरम्यान धोनी आपल्या कसोटी क्रिकेटमधल्या आठवणी शेअर करेल, असा Star Sports वाहिनीचा विचार आहे. जर धोनीने ही ऑफर स्विकारल्यास भारताच्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीत धोनी समालोचन कक्षात पहायला मिळणार आहे.

याआधी दिवस-रात्र कसोटी सामन्यांना बीसीसीआयचा विरोध होता. मात्र सौरव गांगुलीने अध्यक्षपदाची सुत्र हाती घेतल्यानंतर, खास या सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने ७२ गुलाबी चेंडूही मागवल्याचं कळतंय.