भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला टी २० सामना दिल्लीत सुरू आहे. दिल्लीतील प्रदुषणाने धोक्याची पातळी गाठली असूनही भारत-बांगलादेश सामना हलवण्याच्या हाकेकडे दुर्लक्ष करीत उभय संघ हा सामना खेळणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाकडून विविध खेळाडूंची चाचपणी सुरू आहे. या मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे बांगलादेशचा संघ सर्वात अनुभवी खेळाडू शाकिब अल हसन याच्या अनुपस्थितीत ही मालिका खेळत आहे.

टीम इंडियाकडून या सामन्यात युवा खेळाडू शिवम दुबे याला संधी देण्यात आली आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टी २० मध्ये पदार्पण करणाऱ्या शिवम याला कॅप दिली आणि त्याचे संघात स्वागत केले. भारताचे प्रतिनिधित्व करणारा शिवम हा ८२ वा टी-२० क्रिकेटपटू ठरला आहे. देशांतर्गत स्पर्धांमध्ये त्याने मुंबईकडून खेळताना दमदार कामगिरी केली. त्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.

दरम्यान, भारताच्या या सामन्यावर प्रदुषणाची टांगती तलवार आहे. पण असे असले तरीही सामना दिल्लीतच होणार असे स्पष्ट करण्यात आले आहे. अखेरच्या क्षणी सामना अन्यत्र हलवणे अशक्य असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केले. बांगलादेश संघाने याबाबत कोणतीही तक्रार केलेली नसली तरी आरोग्याची चिंता अस्तित्वात आहेच. भारत दौऱ्यावर येण्याआधी अष्टपैलू शाकिब अल हसनवर घातलेल्या बंदीमुळे त्यांना धक्का बसला आहे.