पहिल्या सामन्यात भारताला बांगलादेशकडून हार पत्करावी लागली. नवी दिल्लीतील प्रदूषित वातावरणात पहिल्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर आज गुरुवारी राजकोटवर रंगणाऱ्या दुसऱ्या टी २० क्रिकेट सामन्यात भारतीय संघापुढे दुहेरी आव्हान असणार आहे. राजकोटमध्ये चक्रीवादळाची शक्यता असल्याने यावेळीसुद्धा आव्हानात्मक परिस्थितीतच भारताला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी लढाऊ बांगलादेशला नमवण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे.

अरुण जेटली स्टेडियमवर रविवारी झालेल्या प्रथम लढतीत अनुभवी मुशफिकुर रहिमने केलेली जिगरबाज अर्धशतकी खेळी आणि फिरकीपटू अमिनूल इस्लाम व अफिफ हुसैन यांच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर बांगलादेशने भारताला सात गडी राखून धूळ चारून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. बांगलादेशने भारताविरुद्ध ट्वेन्टी-२० सामन्यांत मिळवलेला हा पहिलाच विजय ठरला.

हे देखील वाचा –  …तर मी स्मिथच्या तोंडावर बॉल फेकून मारला असता – अख्तर

भारताचा कर्णधार रोहित शर्मा सातत्याने धावांचा वर्षांव करीत आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील कामगिरीप्रमाणेच ट्वेन्टी-२० मालिकेतही तो प्रभाव पाडण्यासाठी उत्सुक आहे. पहिल्या लढतीत त्याला अपयश आले असले तरी तो दुसऱ्या सामन्यात त्याची परतफेड करेल, अशी आशा आहे. ऑस्ट्रेलियामधील ट्वेन्टी-२० विश्वचषकाआधी भारताला जवळपास १५ ते २० सामने खेळायचे असून, याद्वारे समतोल संघ तयार करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल.

सामन्यात या विक्रमांकडे असेल लक्ष –

१. श्रेयस अय्यरच्या २०१९ या वर्षांत टी २० क्रिकेटमध्ये ९९० धावा झालेल्या आहेत. १ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला फक्त १० धावांची आवश्यकता आहे. त्या धावा केल्यास तो विक्रमी कामगिरीचा धनी ठरू शकतो.

२. टी २० क्रिकेट सामन्यांत ऋषभ पंतने यष्ट्यांमागे संमिश्र कामगिरी करत आतापर्यंत ४९ झेल टिपले आहेत. ५० झेलचा टप्पा गाठण्यासाठी त्याला केवळ एका झेलची आवश्यकता आहे.

३. गुरुवारी राजकोटच्या खेळपट्टीवर उतरताच रोहितच्या नावावर आणखी एका शतकाची नोंद होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० टी २० सामने खेळणारा रोहित हा भारताचा पहिला पुरूष क्रिकेटपटू ठरणार आहे. या आधी भारताची हरमनप्रीत कौर हिने १०० सामने खेळले आहेत. याशिवाय, टी २० क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा रोहित दुसरा फलंदाज ठरणार आहे. शोएब मलिकने १११ सामन्यांत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले असल्याने तो रोहितपेक्षा पुढे आहे.