बांगलादेशविरुद्ध टी-२० सामन्यात १-० ने पिछाडीवर पडलेला भारतीय संघ, आज राजकोटच्या मैदानावर बरोबरी करण्याच्या उद्देशाने उतरणार आहे. मात्र भारतीय संघाच्या वाटेत अरबी समुद्रात आलेल्या ‘महा’ चक्रीवादळाचं संकट आहे.

अरबी समुद्रात घोंगावणारं ‘महा’ चक्रीवादळ हे सध्या दिव-दमण पट्ट्यात आहे. त्यामुळे हवामान विभागाने राजकोट जिल्ह्यात Orange Alert जाहीर केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राजकोटमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काही कालावधीनंतर या चक्रीवादळचा प्रभाव कमी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आजचा सामना होणार की नाही याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष आहे.

बुधवारी रात्री राजकोट परिसरात मुसधळार पाऊस झाला. मात्र हवामान विभागाने दिलेल्या अंदाजामुळे मैदानावरील कर्मचाऱ्यांनी खेळपट्टी आणि इतर भाग सुरक्षित केला होता. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने केलेल्या कामगिरीवरुन दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने बदलाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष आहे.