इंग्लंडसारख्या मातब्बर संघावर दमदार विजय मिळवत भारतीय संघाने मायदेशात आम्हाला कुणीही पराभूत करू शकत नाही, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारताचेच पारडे जड समजले जात आहे; पण दुसरीकडे बांगलादेशच्या संघाशी सामना करताना गाफील राहून चालणार नाही, कारण काही दिवसांपूर्वीच त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध विक्रमी धावसंख्या उभारत आपली चमक दाखवली होती. कागदावर बांगलादेशपेक्षा भारत बलाढय़ दिसत आहे, पण बांगलादेशला कमी लेखण्याची चूक भारतीय संघाने करता कामा नये.

भारतीय संघात मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांचे स्थान निश्चित आहे; पण भारतीय संघ व्यवस्थापन या सामन्यात किती फलंदाज खेळवणार, यावर सारे समीकरण अवलंबून असेल. जर भारताने सहा फलंदाज खेळवायचे ठरवले, तरीदेखील संघनिवडीत व्यवस्थापनाची कसोटी असेल, कारण इंग्लंडविरुद्ध करुण नायरने त्रिशतक झळकावले होते. त्यामुळे त्याला संघात स्थान द्यावे लागेल; पण अन्य एका सामन्यासाठी अजिंक्य रहाणे आणि अभिनव मुकुंद यांच्यामध्ये चुरस असेल. दुखापतीमुळे अजिंक्यला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांना मुकावे लागले होते, तर दुसरीकडे स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत बऱ्याच वर्षांनी मुकुंदने संघात स्थान मिळवले आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी मंगळवारी केलेल्या वक्तव्याचा अर्थ काढला, तर या सामन्यात अजिंक्यला संधी देण्यात येईल. भारतीय संघ या सामन्यात दोन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाजांनुसार उतरण्याची शक्यता आहे. आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा या फिरकी जोडीने भारतामध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांना ‘सळो की पळो’ करून सोडले आहे. त्यामुळे या दोघांना वगळण्याची जोखीम भारतीय संघ उचलणार नाही. त्यामुळे कुलदीप यादव आणि जयंत यादव यांना संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. दोन वेगवान गोलंदाजांसाठी इशांत शर्मा आणि उमेश यादव यांना पसंती मिळू शकते; पण जर एक वेगवान गोलंदाज खेळण्याचे ठरवले तर जयंत किंवा कुलदीप यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. पार्थिव पटेलला वगळून संघातील यष्टिरक्षणाची जबाबदारी वृद्धिमान सहावर सोपवण्यात आली आहे. इराणी चषक स्पर्धेत साहाने द्विशतकी खेळी साकारत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्याच्या फलंदाजीतील हे सातत्य या सामन्यात पाहायला मिळेल का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

बांगलादेशच्या संघातील काही खेळाडूंकडेही चांगला अनुभव आहे, पण त्यांना आतापर्यंत कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. मुशफिकर रहिम, तमीम इक्बाल, शकिब अल हसन यांनी आतापर्यंत बऱ्याचदा मोठय़ा खेळी साकारल्या आहेत. गोलंदाजीमध्ये तास्किन अहमदकडे चांगला अनुभव असला तरी अन्य खेळाडूंकडे अनुभवाची कमतरता आहे. बांगलादेशला जर या सामन्यात भारताला कडवी झुंज द्यायची असेल तर त्यांना मुख्यत्वेकरून फलंदाजीवर अवलंबून राहावे लागेल.

बांगलादेशने मायदेशात इंग्लंडला पराभूत केले होते, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे हा सामना अधिक रंजकदार होण्याची शक्यता आहे.

 

संघ

  • भारत : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, उमेश यादव, जयंत यादव, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांडय़ा, अभिनव मुकुंद, कुलदीप यादव.
  • बांगलादेश : मुशफिकर रहिम (कर्णधार आणि यष्टिरक्षक), तमीम इक्बाल, सौम्य सरकार, महमुदुल्लाह रियाद, मोमिनुल हक, सब्बीर रहमान, शकिब अल हसन, लिटॉन दास, तास्किन अहमद, मेहंदी हसन मिराझ, मासोदेक होसेन, काम्रुल इस्लाम रब्बी, सुभाशीष रॉय, तैजुल इस्लाम, शफिऊल इस्लाम.

 

वेळ  : सकाळी ९.३० वा.पासून.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर