निदाहास ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत सलामीलाच यजमान श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागल्याने अननुभवी भारतीय संघावर दडपण वाढले आहे. याच दडपणाच्या ओझ्याखाली भारतीय संघ गुरुवारी बांगलादेशचा सामना करणार आहे. स्पध्रेतील वाटचाल सुरळीत ठेवण्यासाठी रोहित शर्माच्या नवोदित संघावर बांगलादेशविरुद्ध विजय मिळवण्याचे आणखी एक दडपण असणार आहे.

सहा महिन्यांपूर्वी श्रीलंकेची भारताविरुद्धची कामगिरी पाहता पाहुण्यांचे पारडे जड मानले जात होते. मात्र यजमानांनी सर्व तर्क चुकवत भारताला नमवले. अर्थात सहा महिन्यांपूर्वीचा आणि आत्ताच्या भारतीय संघात बराच फरक आहे. या स्पर्धेसाठी निवडलेल्या संघातील खेळाडूकडे अनुभवाची कमतरता आहे. मात्र, बांगलादेशविरुद्ध भारताला ही सबब पुढे करून खेळता येणार नाही. मनोबल उंचावण्यासाठी त्यांना बांगलादेशला नमवण्याची किमया साधावी लागणार आहे. रोहित आणि शिखर धवन या सलामीवीरांची कामगिरी भारतासाठी महत्त्वाची ठरणारी आहे. धवनने श्रीलंकेविरुद्ध ९० धावांची खेळी साकारली होती, परंतु रोहितला भोपळाही फोडता आला नव्हता. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध त्याच्या कामगिरीकडे सर्वाच्या नजरा खिळल्या आहेत.

गुरुवारी होणाऱ्या लढतीत रोहित संघात फार बदल करण्याची शक्यता कमीच आहे. सध्याच्या संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज अक्षर पटेलला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसे झाल्यास युजवेंद्र चहलला योग्य साथ मिळेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांच्या अनुपस्थितीत शार्दूल ठाकूर आणि जयदेव उनाडकट यांनी चांगला जम बसवला आहे. मात्र अखेरच्या षटकांत कसा मारा करावा, याचा अनुभव त्यांच्याकडे नसल्याने पहिल्या लढतीत भारताला अपयश आले.

  • भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत (यष्टिरक्षक).
  • बांगलादेश : महमदुल्लाह (कर्णधार), तमीम इक्बाल, सौम्या सरकार, इम्रुल कायेस, मुशफिकर रहिम (यष्टिरक्षक), सब्बीर रहमान, मुस्ताफिझूर रहमान, रुबेल होसेन, तस्कीन अहमद, अबू हिदर, अबू जायेद, अरिफूल हक, नझमूल इस्लाम, नुरूल हसन, मेहिदी हसन, लिटन दास.
  • सामन्याची वेळ : सायं. ७ वा. थेट प्रक्षेपण : जिओ टीव्ही.