आशिया चषकात भारतीय संघाने साखळी फेरीचे सर्व सामने जिंकून मोठ्या दिमाखात स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पण दुसऱया बाजूला बांगलादेशनेही पाकिस्तानला धक्का देऊन अंतिम फेरी गाठली. आशिया चषकात आजवर बांगलादेशला भारतीय संघावर मात करता आलेली नसली तरी सध्याचा बांगलादेशचा संघ पाहता भारताला निश्चिंत राहून चालणार नाही. गेल्या काही वर्षात बांगलादेशची गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्वच बाबतीत चांगली प्रगती झाली आहे. सौम्य सरकार, शब्बीर रेहमान, मेहमदुल्ला आणि मुशफिकुर रहिम या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजी तोफखान्यासमोर चांगली फलंदाजी केली आहे. त्यामुळे हे चार जण भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात. तर, गोलंदाजीत अल अमिन होसेन, तस्किन अहमद अचूक टप्प्यात गोलंदाजी करत आहेत. शाकिब अल हसन देखील आपल्या फिरकीने चांगली साथ देत आहे.
दरम्यान, भारताचा संघ देखील सर्व सामने जिंकून आत्मविश्वासू खेळी साकारण्यास सज्ज आहे. नक्कीच भारताचे पारडे जड आहे यात काहीच शंका नाही. पण ट्वेन्टी-२० सामन्यांचा इतिहास पाहता कोण, केव्हा आणि कधी धक्का देऊ शकतो याचा अंदाज बांधता येणे कठीणच.

व्हिडिओ-

indvsban