भारताचा बांग्लादेशवर ८ विकेट राखुन विजय
जोरदार पावसानंतर आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धावांचाही पाऊस पडला आणि त्यामध्ये अखेर भारताने बाजी मारली. महमुदुल्लाच्या धुवाँधार खेळीच्या जोरावर बांगलादेशने भारतापुढे १२१ धावांचे आव्हान ठेवले होते. पण शिखर धवनचे खणखणीत अर्धशतक आणि त्याला विराट कोहलीने दिलेल्या सुयोग्य साथीच्या जोरावर भारताने अशिया चषकाचे ‘शिखर’ केले असून आता त्यांना विश्वविजेतेपद साद घालत आहे. अंतिम फेरीत भारताने बांगलादेशवर आठ विकेट्स राखून विजय मिळवला.

बांगलादेशच्या १२१ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात आश्वासक झाली नाही. भारताने रोहित शर्माला (१) दुसऱ्या षटकात गमावले. पहिल्या चार षटकांमध्ये भारताला मोठे फटके मारता आले नाहीत. पण धवनने अबू हैदरच्या पाचव्या आणि शकिब अल हसनच्या सहाव्या षटकात प्रत्येकी दोन चौकार लगावत संघाला निर्धारित धावगती मिळवून दिली. विराट कोहलीनेही स्थिरस्थावर झाल्यावर चांगले फटके मारले. या दोन्ही षटकांमध्ये कोहलीने प्रत्येकी एक चौकार लगावत धावगती उंचावण्यात वाटा उचलला. ११ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ‘रीव्हर्स’ स्वीप लगावत त्याने अर्धशतक पूर्ण केले. धवनने ४४ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६० धावा काढल्या. धवन आणि कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी फलंदाजीला आला आणि दमदार फटके लगावत विजयावर शिक्कामोर्तब केले. कोहलीने यावेळी २८ चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ४१ धावा केल्या. धोनीने अवघ्या सहा चेंडूंमध्ये एक चौकार व दोन षटकारांसह नाबाद २० धावांची तुफानी खेळी साकारली.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकत बांगलादेशला फलंदाजीला पाचारण केले आणि त्यांनी महमुदुल्लाहच्या झंझावाती नाबाद खेळीच्या जोरावर १५ षटकांत १२० धावा उभारल्या. आशीष नेहराच्या तिसऱ्या षटकात सौम्य सरकारने (१४) चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर दमदार चौकार लगावले. पण या षटकातील अखेरच्या चेंडूवर हार्दिक पंडय़ाने सौम्यचा झेल घेतला. त्यानंतर ठराविक फरकाने बांगलादेशने फलंदाज गमावले आणि त्यांची ११.४ षटकांत ५ बाद ७५ अशी स्थिती झाली. यावेळी बांगलादेशचा संघ जेमतेम शतकापर्यंत मजल मारेल, असे वाटत होते. पण सातव्या स्थानावर महमुदुल्लाह आला आणि त्याने सारे समीकरणच बदलून टाकले. त्याची ही खेळी फार मोठी नसली तरी झंझावाती मात्र नक्कीच होती. पहिल्या तीन चेंडूंमध्ये त्याने एका चौकारासह ८ धावा काढल्या. त्यानंतर हार्दिक पंडय़ाच्या १४व्या षटकात महमुदुल्लाहने धावांची बरसात करताना दोन षटकार आणि एका चौकारासह तब्बल २१ धावांची लूट केली. पण अखेरच्या षटकात जसप्रीत बुमराहने फक्त सात धावा देत बांगलादेशची धावगती कमी करण्याचा प्रयत्न केला. महमुदुल्लाहने १३ चेंडूंत प्रत्येकी दोन षटकार व चौकार लगावत नाबाद ३३ धावांची दमदार खेळी साकारली. सब्बीरने एक बाजू लावून धरत २९ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीने नाबाद ३२ धावा केल्या.

 

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश : १५ षटकांत ५ बाद १२० (महमुदुल्लाह नाबाद ३३, सब्बीर रहमान नाबाद ३२; जयप्रीत बुमराह १/१३) विजयी वि. भारत : १३.५ षटकांत २ बाद १२२ (शिखर धवन ६०, विराट कोहली नाबाद ४१, महेंद्रसिंग धोनी नाबाद २०; तस्किन अहमद १/१४ )