विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याची स्पर्धा आता अखेरच्या सप्ताहात अधिक तीव्र झाली आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी बांगलादेशविरुद्धच्या लढतीसाठी भारताचे अंतिम ११ खेळाडू निवडताना केदार जाधव आणि यजुर्वेद्र चहल यांनाही वगळले जाऊ शकते. एजबॅस्टन मैदानावर मंगळवारी होणाऱ्या या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज भुवेनश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा यांना संधी मिळू शकते.

भारताने आतापर्यंतच्या सात सामन्यांतून एकूण ११ गुण मिळवले आहे. परंतु बांगलादेशविरुद्धची लढत जिंकल्यास भारताचे उपांत्य फेरीतील स्थान आरामात पक्के होऊ शकेल. बांगलादेशला मात्र प्रथमच उपांत्य फेरीचे स्वप्न साकारण्यासाठी उर्वरित दोन्ही लढती जिंकण्याची नितांत आवश्यकता आहे.

सलग पाच विजयांनंतर इंग्लंडने भारताची विजयी घोडदौड रोखली. परंतु भारताला यातून सावरण्यासाठी अतिशय कमी अवधी मिळाला आहे. जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू असलेल्या बांगलादेशला कमी लेखून चालणार नाही, याची भारताला जाणीव आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पराभवाला मधल्या फळीतील फलंदाज जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. महेंद्रसिंह धोनी आपल्या विजयवीराच्या दर्जाला साजेसा फलंदाजी करू शकला नाही, अशी टीका होत आहे. भारताच्या फलंदाजांनी अखेरच्या पाच षटकांत फक्त ३९ धावा केल्या. मोठे फटके खेळण्यात हे फलंदाज अपयशी ठरले. परंतु भारतीय संघ व्यवस्थापनाने धोनीवरील विश्वास कायम ठेवला आहे.

बांगलादेशची मदार शाकिबवर

बांगलादेशच्या फलंदाजीची मदार प्रामुख्याने शाकिब, तमिम इक्बाल, मुशफिकूर रहिम, लिटन दास आणि महमदुल्ला यांच्यावर आहे. यापैकी शाकिबने ९५.२०च्या सरासरीने ४७६ धावा आणि १० बळी घेऊन अष्टपैलूत्व सिद्ध केले आहे. तसेच मुशफिकूरने ३२७ धावा केल्या आहेत.

गोलंदाजी ही बांगलादेशची प्रमुख उणीव आहे. त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहली नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेईल. कर्णधार मश्रफी मोर्तझाला सहा सामन्यांत फक्त एकमेव बळी मिळवता आलेला आहे. बांगलादेशने आतापर्यंत मिळवलेले यश हे शाकिब, मोहम्मद सैफुद्दीन आणि मुस्ताफिझूर रेहमान यांच्या बळावर मिळवले आहे.

जाधवऐवजी जडेजाला संधी?

  • रवींद्र जडेजाला संघात स्थान देण्यासाठी केदार जाधवला मात्र संघातून वगळले जाऊ शकते. सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरून मोठे फटके खेळण्यात जडेजा हा जाधवपेक्षा अधिक तरबेज आहे, असे म्हटले जात आहे.
  • डावखुरी फिरकी गोलंदाजी आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण ही त्याची वैशिष्टय़े आहेत. हा निर्णय घेण्यामागील आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे या मैदानाच्या एका बाजूची सीमारेषा ६० मीटर्सपेक्षा कमी अंतराची आहे.
  • जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स या इंग्लंडच्या त्रिकुटाने याचा फायदा उचलताना चहल आणि कुलदीप यादव या मनगटी फिरकी गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्यामुळेच दोन मनगटी फिरकी गोलंदाज खेळवणे धोकादायक ठरू शकते.

भुवनेश्वरचे पुनरागमन? : भुवनेश्वर कुमार दुखापतीतून सावरल्याने बांगलादेशविरुद्धच्या लढतीत भारत त्रिस्तरीय वेगवान माऱ्याचे आक्रमण करील. चहलने १० षटकांत ८८ धावा दिल्यामुळे त्याच्या जागी भुवनेश्वर संघात येऊ शकेल. त्यामुळे भारताची तळाची फलंदाजीसुद्धा मजबूत होऊ शकेल.

धोनीवर टीका; कोहलीची पाठराखण

विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडकडून पत्करलेल्या पराभवानंतर अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज महेंद्रसिंह धोनीच्या चक्रावून टाकणाऱ्या फलंदाजीवर माजी क्रिकेटपटूंनी टीका केली आहे; परंतु कर्णधार विराट कोहलीकडून त्याची पाठराखण कायम आहे. इंग्लंडचे ३३८ धावांचे लक्ष्य पेलताना ५० षटकांमध्ये भारताला ५ बाद ३०६ धावा करता आल्या. धोनी आणि केदार जाधव अनुक्रमे ४२ (३१ चेंडू) आणि १२ (१३ चेंडू) धावांवर नाबाद राहिले.

विजयची माघार; मयांकला संधी

पायाच्या अंगठय़ाला झालेल्या दुखापतीमुळे भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अद्याप पदार्पण न केलेल्या मयांक अगरवालची त्याच्या जागी संघात निवड झाली आहे.

अंगठय़ाला झालेल्या दुखापतीमुळे सलामीवीर फलंदाज शिखर धवनला विश्वचषकातील उर्वरित सामन्यांना मुकावे लागले. त्यामुळे ऋषभ पंतचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. विश्वचषकातून माघार घेणारा विजय हा भारताचा दुसरा खेळाडू ठरला.

‘‘विजयच्या डाव्या पायाचा अंगठा फ्रॅक्चर झाला असून, ही दुखापत बरी होण्यासाठी किमान तीन आठवडय़ांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळेच त्याला विश्वचषकातून माघार घ्यावी लागत आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने विजयच्या जागी मयांकच्या समावेशाची विनंती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला केली आहे,’’ अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी दिली.

कर्नाटकचा सलामीवीर मयांकने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. याशिवाय राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखालील भारत-अ संघाच्या इंग्लंड दौऱ्यावरील मयांकची कामगिरी लक्षवेधी होती.

पाच गडी शिल्लक असतानाही एकेरी धावांवर भर का दिला गेला, याचे माझ्याकडे कोणतेही स्पष्टीकरण नाही. चेंडू कुठे जाईल, याची चिंता न करता तो सीमापार धाडणे, हाच दृष्टिकोन हवा होता.     – सौरव गांगुली, भारताचा माजी कर्णधार

मी पूर्णत: गोंधळून गेलो, हे काय चालले आहे? भारताला याची आवश्यकता नाही, तर धावांची आहे. हे काय करीत आहेत? भारतीय चाहते निघून जात आहेत. त्यांना धोनीने फटके खेळावे, अशी इच्छा आहे. – नासीर हुसैन, इंग्लंडचा माजी कर्णधार

भारताची विजयी घोडदौड रोखण्याची क्षमता असलेला संघ म्हणजे इंग्लंडचा आहे. शेवटच्या काही षटकांमधील धोनीचा चक्रावून टाकणारा दृष्टिकोन त्यासाठी कारणीभूत आहे.    – संजय मांजरेकर, भारताचा माजी फलंदाज

चौकार-षटकारांसाठी धोनीने बरीच मेहनत घेतली, परंतु यश आले नाही, असे मला वाटते. त्यांनी योग्य पद्धतीने गोलंदाजी केली. त्यामुळे उत्तरार्धात फलंदाजी करणे अधिक अवघड ठरले.     – विराट कोहली, भारताचा कर्णधार