भारत आणि बांगलादेश यांच्यात रंगणारा दुसरा कसोटी सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. हा कसोटी सामना भारत आणि बांगलादेश या दोनही संघांचा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बांगलादेश क्रिकेट मंडळासमोर (बीसीबी) याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. बांगलादेश क्रिकेट मंडळाने याबाबत होकार दर्शवला असून भारतात पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामन्याचा आनंद चाहत्यांना लुटता येणार आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान हा दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. “दिवस-रात्र कसोटी ही खूपच चांगली संकल्पना आहे. कसोटी क्रिकेटला पाठिंबा देणे आणि प्रेरणा मिळणे आवश्यक आहे. मी आणि माझे सहकारी यासाठी कटिबद्ध आहोत. याशिवाय दिवस-रात्र कसोटी खेळण्याची तयारी दर्शवल्याबद्दल विराट आणि सर्व क्रिकेटपटूंचेही आभार”, असे गांगुलीने सांगितले.

‘‘बीसीसीआयने आम्हाला दिवस-रात्र कसोटी सामन्याविषयी विचारणा केली आहे. आम्ही यावर विचारविनिमय करत आहोत. दोन-तीन दिवसांपूर्वी या विषयीचे पत्र आम्हाला मिळाले आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल,’’ असे बीसीबीचे क्रिकेट संचालक अध्यक्ष अक्रम खान यांनी सांगितले होते. बीसीबीचे अध्यक्ष निझामुद्दीन चौधरी यांनी सांगितले होते की, ‘‘खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतरच याविषयी निर्णय घेण्यात येईल. हा पूर्णपणे तांत्रिक मुद्दा असला तरी या सामन्यासाठी आमची तयारी कितपत झाली आहे, याचा विचार करूनच निर्णय कळवण्यात येईल.’’ त्यानुसार बीसीबीने दिवस-रात्र कसोटीसाठी तयारी दर्शवली.

दरम्यान, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने भारताचा कर्णधार विराट कोहली दिवस-रात्र कसोटीसाठी तयार असल्याचे आधीच सांगितले होते. या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना १४ नोव्हेंबरपासून इंदूर येथे तर दुसरा कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून ईडन गार्डन्सवर होणार आहे.