News Flash

विराटसेनेचा धमाकेदार विजय

पहिल्या सामन्यात भारताचा इंग्लंडवर सनसनाटी विजय

कोहली, जाधवची झंझावाती शतके; पहिल्या सामन्यात भारताचा इंग्लंडवर सनसनाटी विजय

कर्णधार विराट कोहली व केदार जाधव यांची धडाकेबाज शतके याचप्रमाणे त्यांनी उभारलेली द्विशतकी भागीदारी यामुळेच भारताने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सनसनाटी विजय मिळवला. विजयासाठी ३५१ धावांचे अशक्य वाटणारे आव्हान भारताने ४८.१ षटकांत व सात फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. कोहलीने तडाखेबाज खेळ करीत १२२ धावा केल्या तर केदारने आक्रमक खेळाचा प्रत्यय घडवत १२० धावा केल्या.

विजयासाठी ३५१ धावांचा पाठलाग करताना भारताची आघाडीची फळी साफ कोलमडली. शिखर धवन (१) व लोकेश राहुल (८) ही सलामीची जोडी अवघ्या २४ धावांमध्ये तंबूत परतली. या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच युवराज सिंग (१५) व महेंद्रसिंग धोनी (६) हे बाद झाल्यामुळे भारताची ११.५ षटकांत ४ बाद ६३ अशी दयनीय स्थिती झाली.

एका बाजूने कर्णधाराला साजेसा खेळ करणाऱ्या कोहलीला केदार जाधव या स्थानिक खेळाडूने अलौकिक साथ दिली. किंबहुना त्यांच्या भागीदारीत जाधवचाच मोठा वाटा होता. या मैदानावर पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या केदारने अर्धशतक अवघ्या २९ चेंडूंमध्ये पूर्ण करीत इंग्लंडविरुद्ध झटपट अर्धशतक करणारा दुसरा फलंदाज होण्याचा मान मिळवला. यापूर्वी धोनीने २०११मध्ये २६ चेंडूंमध्ये अर्धशतक टोलवले होते. केदार व विराट यांनी संघाच्या शंभर धावा १५.५ षटकांत तर २०० धावा २९.२ षटकांत पार केल्या. या जोडीने एकेरी व दुहेरी धावांबरोबरच आक्रमक फटकेबाजीही करीत खेळपट्टीबाबत बाऊ करण्याजोगी स्थिती नाही, हे दाखवून दिले. कोहलीने ३२व्या षटकांत अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकून एकदिवसीय सामन्यातील २७वे शतक नोंदवले. शतक पूर्ण झाल्यानंतर कोहली फार वेळ टिकला नाही. स्टोक्सने त्याला बाद केले. कोहलीने १०५ चेंडूंमध्ये १२२ धावा करताना आठ चौकार व पाच षटकार अशी आतषबाजी केली. त्याने केदारच्या साथीने २४.३ षटकांत २०० धावांची भर घातली.

केदारने व्होक्सला चौकार मारून इंग्लंडविरुद्ध पहिले शतक साजरे केले. त्या वेळी प्रेक्षकांच्या गॅलरीत उपस्थित असलेल्या केदारच्या आई-वडिलांनी हात उंचावत त्याचे अभिवादन केले.  केदारने अवघ्या ६५ चेंडूंमध्ये हे शतक पार केले. शतकाला दोन धावा बाकी असताना त्याच्या पायात वेदना होत होत्या. त्याकडे दुर्लक्ष करीत त्याने शतक पूर्ण केले. त्याचे एकदिवसीय सामन्यातील हे दुसरे शतक आहे. यापूर्वी झिम्बाब्वेविरुद्ध त्याने शतक केले होते. शतकानंतरही त्याने आक्रमक खेळ सुरू ठेवला. परंतु १२० धावांवर त्याला बाद करण्यात स्टोक्सला यश मिळाले, केदारने ७६ चेंडूंमध्ये १२ चौकार व चार षटकार मारले. हार्दिक पंडय़ाने शेवटच्या फळीत नाबाद ४० धावा करीत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, भारताच्या फिरकी गोलंदाजीपुढे इंग्लंडचे फलंदाज अपयशी ठरतात हे सपशेल खोटे ठरवत इंग्लंडने ५० षटकांमध्ये ७ बाद ३५० असा धावांचा डोंगर रचला. जेसन रॉय व जो रुट यांची शैलीदार अर्धशतके तर बेन स्टोक्सची घणाघाती अर्धशतकी खेळी हे त्यांच्या फलंदाजीचे वैशिष्टय़ ठरले.

इंग्लंडचा सलामीवीर अ‍ॅलेक्स हेल्स लवकर बाद झाला. मग जेसन रॉय व जो रुट यांनी ६९ धावांची भागीदारी करीत भारतीय गोलंदाजांना निष्प्रभ केले. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर रॉय यष्टिचीत झाला. त्याने ६१ चेंडूंमध्ये १२ चौकारांसह ७३ धावा केल्या. रॉय बाद झाल्यानंतर खेळाची सूत्रे स्वत:कडे घेत कर्णधार इऑन मॉर्गनने भारतीय गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. त्याने रुटसोबत षटकामागे सहा धावांचा वेग ठेवला. या जोडीने ४९ धावांची झटपट भर घातली. दोन चौकार व एक षटकार अशी आतषबाजी करणारा मॉर्गन २८ धावांवर तंबूत परतला. जोस बटलरनेही रुटला धावांचा सातत्यपूर्ण वेग ठेवण्यात चांगली साथ दिली. त्याने एक चौकार व दोन षटकार अशी फटकेबाजी करीत ३१ धावा केल्या. या जोडीने ६३ धावांची भागीदारी केली.  रुटने चार चौकार व एक षटकारासह ७८ धावा केल्या. त्यानंतर बेन स्टोक्स याने घणाघाती फलंदाजी करीत अवघ्या ३३ चेंडूंमध्ये अर्धशतक टोलविले. त्याने ४० चेंडूंमध्ये ६२ धावा करताना पाच षटकार व दोन चौकार ठोकले.

धावफलक

  • इंग्लंड : जेसन रॉय यष्टीचीत धोनी गो. जडेजा ७३, अ‍ॅलेक्स हेल्स धावचीत (बुमराह) ९, जो रुट झे. पंडय़ा गो. बुमराह ७८, ईऑन मॉर्गन झे. धोनी गो. पंडय़ा २८, जोस बटलर झे. धवन गो. पंडय़ा ३१, बेन स्टोक्स झे. यादव गो. बुमराह ६२, मोईन अली त्रि. गो. यादव २८, ख्रिस व्होक्स नाबाद ९, डेव्हिड विली नाबाद १०, अवांतर २२ (बाइज १, लेगबाइज ११, वाइड ६, नोबॉल ४),  एकूण ५० षटकांत ७ बाद ३५०.
  • बाद क्रम : १-३९, २-१०८, ३-१५७, ४-२२०, ५-२४४, ६-३१७, ७-३३६
  • गोलंदाजी : उमेश यादव ७-०-६३-१,  हार्दिक पंडय़ा ९-०-४६-२,  जसप्रित बुमराह १०-०-७९-२, रवींद्र जडेजा १०-०-५०-१, रवीचंद्रन अश्विन ८-०-६३-०, केदार जाधव ४-०-२३-०, युवराज सिंग २-०-१४-०.
  • भारत : शिखर धवन झे. अली गो. विली १, लोकेश राहुल त्रि. गो. विली ८, विराट कोहली झे. विली गो. स्टोक्स १२२, युवराज सिंग झे. बटलर गो. स्टोक्स १५, महेंद्रसिंग धोनी झे. विली गो. बॉल ६, केदार जाधव झे. स्टोक्स गो. बॉल १२०, हार्दिक पंडय़ा नाबाद ४०, रवींद्र जडेजा झे. रशीद गो. बॉल १३, रविचंद्रन अश्विन नाबाद १५, अवांतर १६ (बाइज १, लेगबाइज ४, वाइड ११), एकूण ४८.१ षटकांत ७ बाद ३५६
  • बाद क्रम : १-१३, २-२४, ३-५६, ४-६३, ५-२६३, ६-२९१, ७-३१८
  • गोलंदाजी : ख्रिस व्होक्स ८-०-४४-०, डेव्हिड विली ६-०-४७-२, जॅक बॉल १०-०-६७-३, बेन स्टोक्स १०-०-७३-२, आदिल रशीद ५-०-५०-० मोईन अली ६.१-०-४८-०, जो रुट ३-०-२२-०.

आघाडीच्या फळीतील महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर आमच्यासमोर पराभव उभा ठाकला होता. परंतु केदार जाधवने शतकी खेळी साकारताना मला साथ दिली. त्यामुळेच आम्ही हा आश्चर्यजनक विजय मिळवू शकलो.    – विराट कोहली

शतकासाठी मी खेळलोच नाही. कोहलीला साथ देत संघाला विजयश्री मिळवून देण्याचेच माझे ध्येय होते. त्यामध्ये मी यशस्वी झालो. माझ्या या शतकाचे माझे कुटुंबीय साक्षीदार होते, हा माझ्यासाठी मुलखावेगळा आनंद आहे.     – केदार जाधव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 2:50 am

Web Title: india vs england 1st odi virat kohli kedar jadhav hit magical centuries to script sensational win
Next Stories
1 अल्फोन्सेचा अनपेक्षित विजय
2 डोंगरातील सरावामुळे मुंबईतल्या अडथळ्यांवर मात!
3 हुंड्याविरोधात कुस्तीपटू योगेश्वरने थोपटले दंड, हुंड्यात घेतला फक्त १ रुपया
Just Now!
X