England vs India 1st Test Day ३ : भारत इंग्लंड कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारताने ५ बाद ११० धावांपर्यंत मजल मारली. आता भारताला विजयासाठी ८४ धावांची गरज आहे, तर इंग्लंडला विजय मिळवण्यासाठी ५ गडी बाद करणे आवश्यक आहे. सध्या कर्णधार विराट कोहली आणि दिनेश कार्तिक ही अनुभवी जोडी असून कोहली ४३ तर दिनेश कार्तिक १८ धावांवर खेळत आहे. तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला भारताला इंग्लंडचे ३ गडी बाद करायचे होते. या दरम्यान, तळाच्या सॅम कुर्रान या फलंदाजाने अप्रतिम फटकेबाजी करून आपले अर्धशतक (६३) साजरे केले. त्याच्या या खेळाच्या बळावर इंग्लंडने १८० धावांपर्यंत मजल मारली आणि भारतापुढे १९४ धावांचे लक्ष्य ठेवले.

भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली. मुरली विजय (६), शिखर धवन (१३), लोकेश राहुल (१३), अजिंक्य रहाणे (२) आणि रविचंद्रन अश्विन (१३) या पाच खेळाडूंना फार काळ खेळपट्टीवर तग धरता आला नाही. मात्र त्यानंतर आलेल्या दिनेश कार्तिकने कर्णधार कोहलीला साथ दिली आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत टिकून फलंदाजी केली. या डावात आतापर्यंत ब्रॉडने २ तर अँडरसन, स्टोक्स आणि कुर्रांनने प्रत्येकी १ गडी बाद केला आहे.

त्या आधी इंग्लंडचा दुसरा डाव सर्वबाद १८० धावांवर आटोपला. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात आजच्या दिवसात झटपट ६ गडी गमावल्यानंतर अखेर इंग्लंडच्या डावाला स्थैर्य आले होते. तळाचे फलंदाज आदिल रशीद आणि सॅम कुर्रान यांनी डावाला आकार दिला. कुर्रानने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लडने १८० धावांपर्यंत मजल मारली. त्याआधी, भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी उपहारापर्यंत इंग्लंडचा निम्म्याहून अधिक संघ गारद झाला असून इंग्लंडची अवस्था ६ बाद ८६ अशी झाली आहे. दिवसाच्या सुरुवातीला जेनिंग्स ८ धावा करून माघारी परतला. त्यानंतर लगेचच अश्विनला आणखी एक गडी बाद करण्यात यश आले आहे. कर्णधार जो रूट हा १४ धावांवर तंबूत परतला. पहिल्या डावात त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. पाठोपाठ डावखुरा डेव्हिड मलान झेलबाद झाला आहे. या डावातील हा इशांत शर्माचा पहिला गडी ठरला. त्याने अत्यंत शिताफीने मलानला स्लिपमध्ये बाद केले. बेअरस्टोने काही काळ तग धरला. पण २८ धावांवर तो देखील बाद झाला आणि बेन स्टोक्सही ६ धावांवर तंबूत परतला. त्यामुळे इंग्लंडची अवस्था ६ बाद ८६ अशी झाली. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात १ बाद ९ धावा केल्या होत्या. इंग्लंडचा सलामीवीर अॅलिस्टर कुक याला पुन्हा एकदा अश्विनने त्रिफळाचित केले होते. या डावात इशांत शर्माने ५, अश्विनने ३ आणि उमेश यादवने २ गडी बाद केले.

तत्पूर्वी, भारताचा डाव सर्वबाद २७४ धावात आटोपला. एका वेळी बलाढ्य वाटणाऱ्या २८७ धावांचा पाठलाग करताना विराटने अप्रतिम १४९ धावांची खेळी केली. ‘साहेबां’च्या भूमीवर त्याने पहिले आणि कारकिर्दीतील २२वे शतक ठोकले. त्याला उमेश यादवने १६ चेंडूत नाबाद १ धाव, तर इशांत शर्माने १७ चेंडूत ५ धावा काढत त्याला चांगली साथ दिली. याशिवाय, इतर फलंदाज आपला प्रभाव पडू शकले नाहीत. इंग्लंडतर्फे कुर्रानने ४ तर रशीद, स्टोक्स आणि अँडरसनने २-२ गडी बाद केले.