इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना गुरूवारपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. सामन्याच्याआधी वानखेडेच्या पिच क्युरेटरने खेळपट्टीवर सामन्याच्या दुसऱया दिवसापासून फिरकीला मदत मिळेल अशी माहिती दिली आहे. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीला पोषक असल्याचे म्हटले जाते. पण फलंदाजांसोबतच यावेळी खेळपट्टी फिरकीपटूंनाही मदत करेल, असे पिच क्युरेटर रमेश मामूणकर यांनी सांगितले.

वाचा: परफॉर्मन्स सुधारण्यासाठी रहाणेने घेतली या मुंबईकराची मदत

खेळपट्टीवर दुसऱया दिवसाच्या अखेरीस किंवा तिसऱया दिवसाच्या सुरूवातीला फिरकीला चांगली साथ मिळेल. खेळपट्टी पूर्णपणे कोरडी आहे. त्यामुळे सुरूवातीला नेहमीप्रमाणे फलंदाजीला पोषक ठरेल, पण खेळपट्टीवरचे गवत कापण्यात येणार असल्याने सामना सुरू झाल्याच्या दुसऱया दिवशी फिरकीपटूंना मदत होईल. गेल्या काही दिवसांपासून रात्री स्टेडियमवर दव पडत आहे. याशिवाय, खेळपट्टीला सतत पाण देखील दिले जात आहे. गुरूवारी खेळपट्टी पूर्णपणे ताजी असेल, असे रमेश मामूणकर ‘द टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
वानखेडेवर फिरकीला साथ मिळाली तर भारतासाठी फार आनंदाची गोष्ट ठरेल. भारतीय फिरकी गोलंदाजी सध्या दमदार फॉर्मात असून अश्विन, जडेजा आणि जयंत यादव या तिहेरी माऱयासमोर इंग्लंडचे फलंदाज गेल्या दोन सामन्यांत पूर्णपणे निष्प्रभ ठरताना दिसले होते. २०१३ साली वेस्ट इंडिजविरुद्ध वानखेडेच्या स्टेडियमवर अखेरचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळवला गेला होता. या सामन्यात क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर याने निवृत्ती स्विकारली होती. सामन्यात भारतीय फिरकीपटू प्रग्यान ओझा याने तब्बल १० विकेट्स मिळवल्या होत्या. त्यासाठी ओझाला सामनावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला होता. डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा इंग्लंडच्या फलंदाजांसाठी या खेळपट्टीवर डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वाचा: रणजी विश्वात या वर्षात मोडले गेलेले पाच विक्रम..