भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरु आहे. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने चांगली खेळी केली. इंग्लंडचा कर्णधार जो रुटच्या दीड शतकी खेळीने पहिल्या डावात २७ धावांची आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्या डावात ३६४ धावांची खेळी केली होती. मात्र हे लक्ष्य सहज गाठत इंग्लंडने आघाडी घेतली आहे.  इंग्लंडने पहिल्या डावात ३९१ धावा केल्या. डावात रॉरी बर्न्स. जोस बटलर आणि जो रुटने महत्त्वपूर्ण खेळी केली. भारताकडून इशांत शर्माने ३, मोहम्मद सिराजने ४ तर मोहम्मद शमी २ गडी बाद केला. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर जॉनी बेअरस्टो बाद झाला. त्यानं ५७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. इशांत शर्माने इंग्लंडचे तीन गडी बाद केले. जोस बटलरला त्रिफळाचीत केलं. त्यानंतर मोईन अली आणि जो रुटची जोडी चांगलीच जमली. त्यानंतर इशांत शर्माने मोईन अली आणि सॅम करन या दोन खेळाडूंना एका मागोमाग बाद केलं. सॅम करनला खातंही खोलता आलं नाही. मार्क वूडला रविंद्र जडेजाने धावचीत केलं.

जो रुटनं नाबाद १८० धावांची खेळी केली. जो रुटनं कारकिर्दीतलं २२वं शतक ठोकलं. भारताविरुद्ध त्याचं सातवं शतक असून सलग दुसरं शतक आहे. रुटने भारताविरुद्ध सलग ४ वेळा ५०च्या वर धावा केल्या आहेत. त्याने यापूर्वी २०१८ मध्ये केनिंगग्टन ओवल टेस्टमधील दुसऱ्या डावात १२५ धावांची खेळी केली होती. तर या मालिकेतील पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात ६४ आणि १०९ धावांची खेळी केली होती.

दोन्ही संघातील खेळाडू

भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

इंग्लंडचा संघ- जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डोम सिबली, हसीब हमीद, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, जोस बटलर, सॅम करन, ओली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, मार्क वूड