Ind vs Eng 3rd Test : भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने आज चौथ्या दिवसअखेर ९ बाद ३११ धावा केल्या. आता सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी भारताला विजयासाठी १ गडी बाद करायचा आहे, तर इंग्लंडला विजयासाठी २१० धावांची गरज आहे. आज दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा पहिल्या सत्रात इंग्लंडने ४ गडी गमावले. त्यानंतर बटलर-स्टोक्स जोडीने १७९ धावांची भागीदारी करत इंग्लंडच्या डावाला आकार दिला. पण अखेर नव्या चेंडूवर भारताच्या जसप्रीत बुमराने ५ बळी टिपून इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला.

भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीच्या चाैथ्या दिवशी इंग्लंडपुढे विजयासाठी एकूण ५२१ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. बिनबाद २३ या धावसंख्येवरुन आज दिवसाचा खेळ सुरू झाला. पहिल्या सत्रात इंग्लंडने सलामीवीर जेनिंग्स (१३), अॅलिस्टर कुक (१७), कर्णधार जो रूट (१३) आणि नवोदित ओली पोप (१६) हे चार गडी गमावले. पण दुसऱ्या सत्रात इंग्लंडने पूर्ण वर्चस्व राखले. जोस बटलर आणि बेन स्टोक्स जोडीने १७९ धावांची भागीदारी केली. बटलरने झुंजार शतक (१०६) केले. पण बुमराने त्याला बाद केले. पाठोपाठ बेअरस्टो शून्यावर, वोक्स ४ धावांवर आणि स्टोक्स ६२ धावांवर बाद झाला. सध्या आदिल रशीद आणि स्टुअर्ट ब्रॉड हे दोघे मैदानावर खेळत आहेत.

दरम्यान भारताने दुसरा डाव ७ बाद ३५२ धावांवर घोषित केला. त्यामुळे इंग्लंडपुढे विजयासाठी ५२१ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. तत्पूर्वी दुसऱ्या दिवसअखेर भारताने २ बाद १२४ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर तिसऱ्या दिवशी खेळताना चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांनी डाव सावरला. दुसऱ्या सत्रात पुजारा ७२ धावांवर बाद झाला. कोहलीने मात्र शतक ठोकले. हे त्याचे कसोटीतील २०वे, तर कारकिर्दीतील २३ वे शतक ठरले. कोहलीने १०३ धावा केल्या. डावाच्या शेवटच्या एका तासात हार्दिक पांड्याने तडाखेबाज अर्धशतक (५२) ठोकले. त्यामुळे भारताला भक्कम आघाडी मिळाली. रशीदने ३, स्टोक्सने २ तर वोक्स आणि अँडरसनने १-१ बळी टिपला.

त्याआधी दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव केवळ १६१ धावांत आटोपला. हार्दिक पांड्याच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांचे धाबे दणाणले. पाच फलंदाजांना त्याने तंबूत धाडले. जोस बटलरने काही काळ झुंज दिली. पण फटके मारण्याच्या नादात तो देखील सर्वाधिक ३९ धावा करून बाद झाला. हार्दिकने केवळ २८ धावांत ५ बळी टिपले. तर इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराने यांनी प्रत्येकी २ आणि मोहम्मद शमीने १ बळी टिपला. आपला पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या ऋषभ पंतने पाच झेल टिपले.

तत्पूर्वी, भारताचा पहिला डाव ३२९ धावांत संपला. भारताकडून विराट-अजिंक्य वगळता भारताचे फलंदाज पुन्हा अपयशी ठरले. विराटने ९७ तर अजिंक्यने ८१ धावा काढत भारताला मजबूत स्थितीत आणले होते. पण पुढील फलंदाजांनी मात्र निराशा केली. पहिल्या डावात इंग्लंडकडून ख्रिस वोक्स, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी ३-३ बळी टिपले, तर आदिल रशीदने १ गडी बाद केला.

Live Blog

23:41 (IST)21 Aug 2018
'बुमरा का हमला'; भारत विजयापासून १ पाऊल दूर...

भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने आज चौथ्या दिवसअखेर ९ बाद ३११ धावा केल्या. आता सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी भारताला विजयासाठी १ गडी बाद करायचा आहे, तर इंग्लंडला विजयासाठी २१० धावांची गरज आहे.

22:23 (IST)21 Aug 2018
नव्या चेंडूमुळे इंग्लंडचा डाव कोलमडला, भारताला विजयासाठी २ बळींची आवश्यकता

नव्या चेंडूमुळे इंग्लंडचा डाव कोलमडला, भारताला विजयासाठी २ बळींची आवश्यकता

21:22 (IST)21 Aug 2018
इंग्लंडची द्विशतकी मजल, अष्टपैलू स्टोक्सचे अर्धशतक

जोस बटलरने केलेल्या भक्कम खेळीच्या जोरावर इंग्लंडने द्विशतकी मजल मारली.  या बरोबरच अष्टपैलू स्टोक्सनेही अर्धशतक पूर्ण झाले.

20:16 (IST)21 Aug 2018
इंग्लंडचा जोरदार ‘कमबॅक’, दुसऱ्या सत्रात राखले पूर्ण वर्चस्व

इंग्लंडचा जोरदार ‘कमबॅक’, दुसऱ्या सत्रात राखले पूर्ण वर्चस्व

19:52 (IST)21 Aug 2018
बटलरचे झुंजार अर्धशतक, स्टोक्सच्या साथीने डाव सावरला

इंग्लंडच्या जोस बटलरने झुंजार अर्धशतक केले आणि बेन स्टोक्सच्या साथीने डाव सावरला. त्यामुळे दुसऱ्या सत्रात भारताला एकही बळी बाद करता आलेला नाही.

17:42 (IST)21 Aug 2018
भारताचा विजय दृष्टीपथात, उपहारापर्यंत इंग्लंड ४ बाद ८४

तिसऱ्या कसोटीत भारताचा विजय दृष्टीपथात आहे. उपहारापर्यंत इंग्लंडची अवस्था ४ बाद ८४ अशी झाली असून इंग्लंडला विजयासाठी आणखी ४३७ धावांची गरज आहे. 

16:54 (IST)21 Aug 2018
कर्णधार जो रूटपाठोपाठ पोपही बाद, इंग्लंडला चौथा धक्का

इंग्लंडचा कर्णधार जो रूट बाद झाल्यानंतर पाठोपाठ नवोदित पोपही बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला झेलबाद केले.

16:50 (IST)21 Aug 2018
कर्णधार जो रूट माघारी, इंग्लंडचा तिसरा गडी बाद

कर्णधार जो रूट माघारी, इंग्लंडचा तिसरा गडी बाद, बुमराला पहिले यश

15:49 (IST)21 Aug 2018
अनुभवी कूक बाद, इंग्लंडला दुसरा धक्का

इशांत शर्माच्या गोलंदाजीची जादू चालली. अनुभवी अॅलिस्टर कूकला त्याने झेलबाद होण्यास भाग पाडले.

15:42 (IST)21 Aug 2018
इंग्लंडला पहिला धक्का, जेनिंग्स माघारी

तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद २३ धावांवरून डावाला सुरूवात करताना इंग्लंडने पहिला गडी गमावला.  कीटॉन जेनिंग्स इशांत शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला.