Ind vs Eng : भारत विरूद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडवर २०३ धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी मिळवलेल्या विजयामुळे भारताने या मालिकेत आपल्या विजयाचे खाते उघडले असून सध्या भारत २-१ ने पिछाडीवर आहे. इंग्लंडने काल चौथ्या दिवसअखेर ९ बाद ३११ धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात इंग्लंडने ४ गडी गमावले. त्यानंतर बटलर-स्टोक्स जोडीने १७९ धावांची भागीदारी करत इंग्लंडच्या डावाला आकार दिला. पण अखेर नव्या चेंडूवर भारताच्या जसप्रीत बुमराने ५ बळी टिपून इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला आणि भारताला इंग्लंडच्या भूमीत ४ वर्षांनी विजय मिळवून दिला. या व्यतिरिक्त इशांतने २, अश्विन, मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्याने १-१ गडी बाद केला. पहिल्या डावात ९७ तर दुसऱ्या डावात १०३ धावा करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीला सामनावीर घोषित करण्यात आले.

बिनबाद २३ या धावसंख्येवरुन चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला होता. पहिल्या सत्रात इंग्लंडने सलामीवीर जेनिंग्स (१३), अॅलिस्टर कुक (१७), कर्णधार जो रूट (१३) आणि नवोदित ओली पोप (१६) हे चार गडी गमावले. पण दुसऱ्या सत्रात इंग्लंडने पूर्ण वर्चस्व राखले. जोस बटलर आणि बेन स्टोक्स जोडीने १७९ धावांची भागीदारी केली. बटलरने झुंजार शतक (१०६) केले. पण बुमराने त्याला बाद केले. पाठोपाठ बेअरस्टो शून्यावर, वोक्स ४ धावांवर आणि स्टोक्स ६२ धावांवर बाद झाला.

दरम्यान भारताने दुसरा डाव ७ बाद ३५२ धावांवर घोषित केला. त्यामुळे इंग्लंडपुढे विजयासाठी ५२१ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. तत्पूर्वी दुसऱ्या दिवसअखेर भारताने २ बाद १२४ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर तिसऱ्या दिवशी खेळताना चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांनी डाव सावरला. दुसऱ्या सत्रात पुजारा ७२ धावांवर बाद झाला. कोहलीने मात्र शतक ठोकले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील २३ वे शतक ठरले. कोहलीने १०३ धावा केल्या. डावाच्या शेवटच्या एका तासात हार्दिक पांड्याने तडाखेबाज अर्धशतक (५२) ठोकले. त्यामुळे भारताला भक्कम आघाडी मिळाली. रशीदने ३, स्टोक्सने २ तर वोक्स आणि अँडरसनने १-१ बळी टिपला.

त्याआधी दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव केवळ १६१ धावांत आटोपला. हार्दिक पांड्याच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांचे धाबे दणाणले. पाच फलंदाजांना त्याने तंबूत धाडले. जोस बटलरने काही काळ झुंज दिली. पण फटके मारण्याच्या नादात तो देखील सर्वाधिक ३९ धावा करून बाद झाला. हार्दिकने केवळ २८ धावांत ५ बळी टिपले. तर इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराने यांनी प्रत्येकी २ आणि मोहम्मद शमीने १ बळी टिपला. आपला पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या ऋषभ पंतने पाच झेल टिपले.

तत्पूर्वी, भारताचा पहिला डाव ३२९ धावांत संपला. भारताकडून विराट-अजिंक्य वगळता भारताचे फलंदाज पुन्हा अपयशी ठरले. विराटने ९७ तर अजिंक्यने ८१ धावा काढत भारताला मजबूत स्थितीत आणले होते. पण पुढील फलंदाजांनी मात्र निराशा केली. पहिल्या डावात इंग्लंडकडून ख्रिस वोक्स, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी ३-३ बळी टिपले, तर आदिल रशीदने १ गडी बाद केला.