News Flash

IND vs ENG : मोटेराच्या खेळपट्टीवरुन इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंची मतमतांतरे

काहींनी खेळपट्टीला दोषी ठरवले आहे.

अहमदाबादच्या नव्या कोऱ्या नरेंद्र मोद क्रिकेट स्टेडिअमवर फिरकीच्या बळावर भारताने गुरुवारी विजयाक्षरे उमटवली. या दोन दिवसीय फिरकीच्या महोत्सवाच्या बुधवारी पहिल्या दिवशी १३ आणि गुरुवारी दुसऱ्या दिवशी १७ फलंदाज बाद झाले. इंग्लंडचे ४९ धावांचे तटपुंजे लक्ष्य आरामात पेलत भारताने ७.४ षठकांत १० गडी राखून तिसरी कसोटी जिंकली आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली. दोन्ही डावांत मिळून ११ बळी मिळवणारा अक्षर पटेल भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. तिसरा कसोटी सामना दिवसात संपल्यानंतर अनेक दिग्गजांनी मोटेराच्या खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मोटेराच्या खेळपट्टीवरून इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी भिन्न मते व्यक्त केली आहेत. काहींनी खेळपट्टीला दोषी ठरवले आहे. तर काहींनी इंग्लंडच्या फलंदाजांवर ताशेरे ओढले आहेत. पाहूयात कोण काय म्हणालं?

नासिर हुसेन, इंग्लंडचा माजी कर्णधार –
इंग्लंडने अतिशय सुमार फलंदाजी केली. चेपॉकवर दुसऱ्या कसोटीत झालेल्या पराभवातून त्यांनी बोध घेतला नाही. ही खेळपट्टी दुसऱ्याच दिवशी ८१ धावांत गारद होण्यासारखी मुळीच नव्हती. त्यामुळे खेळपट्टीला दोष देण्यापेक्षा इंग्लंडने फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

अ‍ॅलिस्टर कूक, इंग्लंडचा माजी फलंदाज –
विराट कोहलीने केलेली खेळपट्टीची पाठराखण पाहून मला आश्चर्य वाटले. इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली, परंतु म्हणून तुम्ही फक्त फलंदाजांवर खापर फोडू शकत नाही. खेळपट्टी कसोटी क्रिकेटसाठी योग्य नव्हती. त्यामुळेच दोन दिवसांत निकाल लागला.

इयान बेल, इंग्लंडचा माजी फलंदाज –
इंग्लंड भविष्याचा फार विचार करत आहे. अ‍ॅशेसइतकीच भारताविरुद्धची कसोटी मालिका महत्त्वपूर्ण असूनही इंग्लंड महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देत आहे. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट मंडळ आणि संघव्यवस्थापनाने लवकरच खेळाडू व्यवस्थापन धोरण पूर्णपणे बरखास्त करावे अथवा त्यामध्ये काही बदल करावेत.

एका संघाला तीनदा फलंदाजी करण्याची संधी द्यावी – मायकेल वॉन 
कसोटी सामना दोन दिवसांत संपणे, ही गोष्टच मनाला पटत नाही. दोन्ही संघांतील फलंदाजांनी सुमारच खेळ केला, परंतु भारताचे गोलंदाज इंग्लंडपेक्षा वरचढ ठरले. मात्र अशा खेळपट्टीवरच सामने आयोजित करायचे असल्यास एका संघाला तीनदा फलंदाजी करण्याची संधी द्यावी.

खेळपट्टीमुळे आमचा अपेक्षाभंग -सिल्वरवूड
मोटेराची खेळपट्टी फिरकीपटूंना लाभदायक असेल, हे ठाऊक होते. परंतु दोन दिवसांतच सामना संपल्याने आमचा अपेक्षाभंग झाला, असे मत इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांनी व्यक्त केले. ‘‘भारताने आमच्यापेक्षा सरस खेळ केला, परंतु प्रकाशझोतातील कसोटीतही खेळपट्टी फिरकीपटूंसाठी पहिल्या दिवसापासूनच इतकी लाभदायक ठरेल, याची आम्हाला कल्पना नव्हती. किमान चौथ्या दिवसापर्यंत कसोटी लांबेल, असे आम्हाला वाटले होते. मात्र आमच्या पदरी निराशा पडली. खेळपट्टीविषयी अधिक भाष्य करण्यासाठी मी उत्सुक नाही,’’ असे सिल्वरवूड म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2021 11:40 am

Web Title: india vs england 3rd test pitch england former cricketer nck 90
टॅग : India Vs England
Next Stories
1 Ind vs Eng: “भारताने सामना जिंकला, पण…”; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचं मत
2 विराटच्या वक्तव्यावर इंग्लंडचा माजी कर्णधार नाराज, म्हणाला…
3 Ind vs Eng: इंग्लंडच्या फलंदाजांची अवस्था भित्र्या सश्यासारखी!
Just Now!
X