News Flash

Ind vs Eng 4th Test: तिन्ही निकालांची शक्यता पण… भारताविरोधात जे कोणालाच जमलं नाही ते इंग्लंड करुन दाखवणार का?

भारताने ३६८ धावांचे लक्ष्य दिले. मात्र इंग्लंडच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात करून चोख प्रत्युत्तर दिल्याने अखेरच्या दिवशी कोणता संघ बाजी मारतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार.

India vs England 4th Test
पहिल्या सत्रातील खेळ ठरणार महत्वाचा (प्रातिनिधिक फोटो)

ओव्हल येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लड कसोटीतील चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद ७७ धावा केल्या असून त्यांना विजयासाठी आणखी २९१ धावांची आवश्यकता आहे.  मुंबईकर अष्टपैलू शार्दूल ठाकूर (६० धावा) आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत (५०) यांनी रचलेल्या बहुमूल्य शतकी भागीदारीमुळे चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडला ३६८ धावांचे लक्ष्य दिले. मात्र इंग्लंडच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात करून भारताला चोख प्रत्युत्तर दिल्यामुळे अखेरच्या दिवशी कोणता संघ बाजी मारतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या सामन्याचे तिन्ही निकाल शक्य असून इंग्लंडने सामना जिंकला तर ते मालिकेमध्ये आघाडी घेतील. भारताने सामना जिंकला तर मालिकेतील विजयाचं पारडं २-१ ने जड होईल. तर सामना अनिर्णित राहिल्यास पाचवा कसोटी सामना निर्णायक ठरेल. सध्याची सामन्याची स्थिती पाहता भारताचं पारडं जड वाटत असलं तरी इंग्लंडने यापूर्वी एवढी मोठी धावसंख्या करण्याचा पराक्रम केल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांनाही तशी चिंताच आहे.

भारताविरोधात चौथ्या डावामध्ये ३५० धावांहून अधिक लक्ष्य कोणत्याच संघाला पूर्ण करता आला नाही ही जमेची बाजू असली तरी दुसरीकडे इंग्लंडने असा पराक्रम ऑस्ट्रेलियाविरोधात केलाय. ऑस्ट्रेलियाविरोधात इंग्लडने चौथ्या डावात ३६२ धावा करुन सामना जिंकला होता.

नक्की वाचा >> “भारताला सामना जिंकायचा असेल तर विराटने पहिल्या तासाभरात…”; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा सल्ला

भारताला संधी कारण…

भारत जिंकण्याची शक्यता अधिक असणाऱ्याचं कारणं म्हणजे आकडेवारी. भारताने ३०० पेक्षा अधिक धावांचं लक्ष्य देऊन सामना गमावल्याची घटना एकदाच घडलीय आणि ती सुद्धा ४४ वर्षांपूर्वी. त्यानंतर भारताविरोधात कोणत्याही संघाला धावांचा ३५० पलीकडील टप्पा चौथ्या डावात गाठता आला नाही. सध्याची भारतीय संघाची गोलंदाजी पाहिल्यास ती फारच संतुलित असून या गोलंदाजीसमोर इंग्लंड वेगाने धावा करेल अशी शक्यता कमी आहे. जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुरसारखे गोलंदाज भारताकडे आहेत. तर फिरकीमध्ये रवींद्र जडेजाकडून काही विकेट्सची अपेक्षा आहे.

इंग्लंडला संधी कारण…

इंग्लंडचा संघ विजयी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ३६८ धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाअखेरीस यजमान संघाने ७७ धावा केल्या असून त्यांच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करुन दिलीय. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील काही तास इंग्लंडचे फलंदाज संभाळून खेळले आणि त्यांच्या फार विकेट्स गेल्या नाही तर भारतासाठी चौथ्या कसोटीचा पेपर अवघड जाऊ शकतो. ओवलची खेळपट्टी फलंदाजीसाठी अजूनही चांगली असल्याचं सांगितलं जात आहे. इंग्लंडच्या मधल्या फळीतील फलंदाज फारच सुंदर खेळ करत आहेत. जो रुट, जॉनी बेयरस्ट्रो संपूर्ण मालिकेत चांगले खेळलेत. ओली पॉप आणि क्रिस वोक्सने या सामन्यात तर डेविड मलानने मागील सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. मोईन अलीसुद्धा चांगली फलंदाजी करतोय.

इंग्लंडच्या बाजूने पारडं जड असण्याचं कारण म्हणजे ते ओवलवर फार वेगाने धावा काढतात. इंग्लडने याच मैदानामध्ये २००७ साली चौथ्या डावामध्ये ११० षटकांमध्ये ६ खेळाडूंच्या मोबदल्यात ३६९ धावा केल्या होत्या. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी याच वेगाने फलंदाजी करावी लागणार आहे. पहिल्या सत्रातील खेळावर सामन्याचा निकाल अवलंबून असणार आहे. जो संघ पहिलं आणि दुसरं सत्र चांगल्या पद्धतीने खेळून काढेल त्याच्या विजयाच्या आशा वाढणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2021 1:12 pm

Web Title: india vs england 4th test chase records will england chase highest ever score at oval or will india win day 5 scsg 91
टॅग : Cricket
Next Stories
1 VIDEO: रोहित शर्माने शतक झळकवताच, पत्नी रितिकाने स्टेडियममध्ये दिला KISS
2 T20 World 2021 : १५ खेळाडूंचा समावेश असणारा भारतीय संघ निश्चित; कसोटी संपताच घोषणेची शक्यता
3 भारत-इंग्लंड कसोटी मालिका : शार्दूलच्या खेळीनंतर इंग्लंडचे चोख प्रत्युत्तर
Just Now!
X