India vs England 4th Test: चौथ्या कसोटीतही भारताने इंग्लंडचा दारुण पराभव केला आहे. भारताने एक डाव राखून आणि २५ धावांनी इंग्लंडचा पराभव केला. भारताने पहिल्या डाव्यात १६० धावांची आघाडी घेतल्यानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाचे फलंदाज आर अश्विन आणि अक्षर पटेलच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले. दोघांनीही प्रत्येकी पाच विकेट घेत भारताच्या नावावर अजून एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. या सामन्यासोबतच भारताने चार सामन्यांची ही कसोटी मालिका ३-१ ने जिंकली आहे. या विजयासोबतच भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपसाठी पात्र झाला आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर वॉशिंग्टन आणि अक्षर पटेल यांनी पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंजांसमोर विकेट मिळवण्यासाठी आव्हान निर्माण केलं होतं. दोघांनी मिळून एकूण १०० धावांची भागीदारी केला. मात्र ४३ धावांवर असताना अक्षर पटेल रन आऊट झाला आणि अर्धशतकाची संधी हुकली. दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदरकडे मात्र शतकाची संधी होती. पण इशांत आणि सिराज यांनी आपली विकेट गमावल्यामुळे शतकाची संधी पुन्हा एकदा हुकली. वॉशिंग्टन ९६ धावांवर नाबाद राहिला. ३६५ धावांवर ऑल आऊट झालेल्या भारतीय संघाने १६० धावांची आघाडी घेतली होती.

ऋषभ पंतने दुसऱ्या दिवशी केलेली जबरदस्त खेळी आणि वॉशिंग्टनच्या फलंदाजीमुळे भारताने १६० धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताकडे ८९ धावांची आघाडी होती.

दरम्यान इंग्लंड संघ चहापानानंतर मैदानात उतरताच अश्विनने क्रॉलीची विकेट घेत इंग्लंडला पहिला धक्का दिला. यानंतर आलेला ब्रेनस्टॉ खातंही उघडू शकला नाही. अश्विनने रोहित शर्माच्या हाती त्याला झेलबाद केलं. यानंतर अक्षरने सिब्ले आणि बेन स्टोक्सची विकेट घेत इंग्लंडसमोर पराभवाचं संकट निर्माण केलं आहे. इंग्लंडची धावसंख्या २० ओव्हर्सनंतर ४० धावांवर ४ बाद अशी झाली होती. यानंतर अश्विन आणि अक्षरने जो रुट आणि पोपची विकेट घेत इंग्लंडवर पराभवाचं संकट निर्माण केलं. डॅन लॉरेन्स वगळता इंग्लंडचा एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभी करु शकला नाही. लॉरेन्सने अर्धशतक आणि जो रुटने केलेल्या ३० धावा या सर्वाधिक धावसंख्या ठरल्या. सहा फलंदाज एक अंकी धावसंख्येवरच तंबूत परतले.

भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या इंग्लंड संघाला पहिल्या डावात २०५ धावांवर ऑल आऊट केलं होतं. दुसऱ्या डावात मात्र इंग्लंडचा संघ १३५ धावांमध्येच गारद झाला.