भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरूवात झाली आहे. इंग्लंडने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला असून त्यांची सुरूवात मात्र खराब झालीये. भारतीयांच्या अचूक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा निम्मा संघ गारद झालाय. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने एकट्याने थोडीफार झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण अर्धशतकी खेळी केल्यानंतर तो देखील बाद झाला आहे. स्टोक्सला वॉशिंग्टन सुंदरने तंबूत पाठवलं. स्टोक्सने 121 चेंडूत 6 फोर आणि 2 सिक्ससह 55 धावांची खेळी केली. सध्या ५६ षटकांमध्ये पाच गडी बाद १४४ धावा अशी इंग्लंडची स्थिती झाली आहे.

दरम्यान, पहिल्या सत्रामध्येच इंग्लंडचे तीन फलंदाज बाद झाले होते. पहिल्यांदा फिरकीपटू अक्षर पटेलने इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूत धाडलं. वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर डॉमिनिक सिब्ले याला अक्षरने त्रिफळाचीत केलं. त्याने फक्त दोन धावा काढल्या, सिब्लेच्या पाठोपाठ दुसरा सलामीवीर जॅक क्रॉले यालाही अक्षरने मोहम्मद सिराजच्या हाती झेल द्यायला भाग पाडलं. क्रॉलीने ९ धावा केल्या. त्यानंतर मैदानात जॉनी बेयरस्टो आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट यांची जोडी खेळत होती. पण मोहम्मद सिराजने कर्णधार जो रुटला पाच धावांवर पायचीत करत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. त्यानंतर दुसऱ्या सत्राच्या खेळाला सूरूवात होताच पुन्हा एकदा सिराजने इंग्लंडला धक्का देत जॉनी बेयरस्टोलाही पायचीत पकडलं. बेयरस्टो २८ धावा काढून बाद झाला. सध्या बेन स्टोक्स (४० धावा) आणि ओली पोप( धावा- ९) मैदानावर असून ४१ षटकांत चार बाद १०७ इतकी इंग्लंडची धावसंख्या झाली आहे. डाव सावरण्याचा दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न सुरू आहे.

भारताने या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संधी दिली आहे. तर, इंग्लंडचा संघ तीन गोलंदाजांसह मैदानात उतरला असून जोफ्रा आर्चर आणि स्टुर्अट ब्रॉडला संघात जागा मिळालेली नाही. फलंदाजी भक्कम करण्यासाठी इंग्लंडने डॅनियल लॉरेन्सला संघात स्थान दिलंय, तर स्पिनर डोमिनिक बेस यालाही अखेरच्या कसोटीत संधी मिळाली आहे. या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजीचा भार जेम्स अँडरसन, बेस आणि लीच यांच्यावर असेल. शिवाय, अष्टपैलू बेन स्टोक्स देखील गोलंदाजी करताना दिसेल.

दरम्यान, मोटेराच्या अनुकूल खेळपट्टीवर गुरुवारपासून सुरू झालेल्या चौथ्या कसोटीत फिरकीच्या बळावर वर्चस्व गाजवून इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकण्यापेक्षा लॉर्ड्सवर जागतिक कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे लक्ष्य असेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडे सध्या २-१ अशी आघाडी असून, जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी न्यूझीलंडला भिडण्यासाठी अखेरची कसोटी किमान अनिर्णीत राखण्याची आवश्यकता आहे. भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम सामन्यासाठी थेट पात्र ठरेल.

सामना अनिर्णीत राखणे हा सुरक्षित पर्याय असला तरी आक्रमक वृत्तीच्या कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना हा बचावात्मक पर्याय मुळीच मान्य नाही. मोटेरावर तिसऱ्या कसोटीत गुलाबी चेंडूनिशी खेळताना भारताने दोन दिवसांत इंग्लंडला नामोहरम केल्यानंतर खेळपट्टीवरून खडाजंगी रंगली. मालिकेतील अखेरचा सामना इंग्लंडने जिंकल्यास त्यांना प्रतिष्ठा टिकवता येईल, परंतु भारताने गमावल्यास मानहानीकारक ठरेल.

अश्विन-अक्षरचे वर्चस्व

पहिल्या तीन कसोटी सामन्यात इंग्लंडच्या ६० बळींपैकी ४९ बळी हे फिरकीच्या बळावर मिळालेले आहेत. यात रविचंद्रन अश्विन (२४ बळी) आणि अक्षर पटेल (१८ बळी) या जोडगोळीचे मालिकेवर प्रामुख्याने वर्चस्व आढळले. दोघांनी मिळून एकूण ४२ बळी मिळवले आहेत. अक्षर पटेलने सरळ चेंडू टाकले, परंतु फिरकीचे दडपण बाळगणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. तशी चेन्नईच्या दुसऱ्या कसोटीपासूनच भारताने फिरकीचे चक्रव्यूह रचण्यात धन्यता मानली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीप्रमाणेच चौथ्या कसोटीसाठीही खेळपट्टी असेल, असा दावा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि झ्ॉक क्रॉवली यांनी केला आहे. परंतु लाल चेंडू गुलाबी चेंडूपेक्षा कमी घसरतो, त्यामुळे उभय संघांत रंगतदार लढत होईल, अशी अपेक्षा आहे.

रोहितवगळता अन्य फलंदाजांकडून अपेक्षा

मायदेशातील खेळपट्टय़ांवर गोलंदाज कर्तृत्व गाजवत असताना फलंदाजांकडून मात्र निराशा होते आहे. मागील चार डावांत इंग्लंडची फलंदाजी अधिक निराशाजनक झाली, हेच भारतासाठी दिलासादायक ठरले. भारतीय फलंदाजांमध्ये रोहित शर्माने सर्वाधिक २९६ धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर अश्विन (१९६ धावा) आहे. चेपॉकमधील त्याचे शतक संस्मरणीय ठरले होते. या मालिकेत रोहितवगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले आहेत. कोहलीने दोन अर्धशतके झळकावली आहेत. पण अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा व शुभमन गिल यांना एखाद्याच डावात लक्ष वेधता आले आहे.

कोहलीचे नेतृत्व पणाला

चौथ्या कसोटीत कोहलीचे नेतृत्व पणाला लागले आहे. महेंद्रसिंह धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) स्पर्धामधील यशस्वी कर्णधार असल्याचे भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरलेल्या कोहलीनेही मान्य केले आहे. त्यामुळे ‘आयसीसी’ कसोटी अजिंक्यपद जिंकल्यास ते कोहलीच्या नेतृत्वाखालील पहिले यश ठरेल. २०१९मध्ये कोलकाता येथे बांगलादेशविरुद्ध कोहलीने अखेरचे शतक झळकावले आहे. त्यानंतर ११ डावांत त्याला शतकाने हुलकावणी दिली आहे. चालू मालिकेतही त्याने दोन अर्धशतके नोंदवली आहेत. आणखी एक शतक साकारल्यास तो कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकांचा रिकी पॉटिंगचा (४१ शतके) मोडीत काढू शकेल.

संघ

* भारत : रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार) , अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर) , आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मा.

* इंग्लंड : जो रूट (कर्णधार), डॉमिनिक सिब्ले, जॅक क्रॉले, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, ओली पोप, डी लॉरेन्स, बेन फोक्स, डॉमनिक बेस, जॅक लीच, आणि जेम्स अँडरसन.