News Flash

India vs England 4th Test : कोण आत कोण बाहेर? विराट समोर प्रश्नच प्रश्न; अशी असू शकते Playing 11

पाच कसोटी सामन्यांची मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत असून, आघाडीच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.

India vs England 4th Test
आजपासून सुरु होणार चौथा सामना (फोटो बीसीसीआय ट्विटरवरुन साभार)

लीड्सच्या मानहानीकारक पराभवानंतर दी ओव्हल येथे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघनिवडीत करताना उपकर्णधार अजिंक्य रहाणेचे धावांसाठी झगडणे आणि वरिष्ठ फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या समावेशाची शक्यता हे घटक महत्त्वाचे ठरतील असं चित्र दिसत आहे. लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आत्मविश्वास उंचावणाऱ्या भारतीय संघाने हेडिंग्लेवर दोन्ही डावांत हाराकिरी पत्करली. पाच कसोटी सामन्यांची मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत असून, आघाडीच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. लॉड्सवरील विजय पुढील सामन्यात जिंकण्याची हमी देत नाही. याचप्रमाणे हेडिंग्लेवरील पराभवाचा अर्थ ओव्हलवर मालिका १-१ अशी स्थिरावेल, असा होत नाही, असे भाष्य कर्णधार विराट कोहलीने केले होते.

रहाणेला संधी मिळण्याची शक्यता

मेलबर्नवरील शतक आणि लॉडर्सच्या दुसऱ्या डावात ६१ धावा हीच रहाणेची पुंजी आहे. परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये त्याच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव जाणवत आहे. इंग्लंडमधील पाच डावांत रहाणेने १९च्या सरासरीने एकूण ९५ धावा केल्या आहेत. त्यामुळे धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव किंवा अष्टपैलू हनुमा विहारीचे पर्याय भारतापुढे मधल्या फळीत उपलब्ध आहेत. परंतु रहाणेला सध्या तरी आणखी एक संधी मिळू शकेल अशी शक्यता दिसत आहे.

अश्विनला मिळणार का संधी?

ओव्हलची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्यामुळे फिरकी गोलंदाजाच्या एका जागेसाठी जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज अश्विनला संधी मिळू शकते. अश्विनने सरेकडून कौंटी सामन्यात सॉमरसेटविरुद्ध सहा बळी घेतले आहेत. त्यामुळेच चारशेहून अधिक बळी खात्यावर असणाऱ्या अश्विनला प्राधान्य दिले जाऊ शकते.

कोहली-पुजाराच्या फलंदाजीचीही चिंता

कोहली, रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांची फलंदाजी भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. हेडिंग्लेवर साकारलेल्या ९१ धावांच्या खेळीने पुजाराला दिलासा दिला आहे. अतिरिक्त फलंदाजाबाबत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीसुद्धा सूचना केली आहे. तिसऱ्या कसोटीत सलामीवीर रोहित शर्मा आणि के. एल. राहुलसुद्धा अपयशी ठरले. कोहलीने तीन सामन्यांत एकूण १२४ धावा केल्या आहेत. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणाया रवींद्र जडेजाने तीन सामन्यांत एकूण १३३ धावा केल्या आहेत आणि फक्त दोन बळी घेतले आहेत.

इशांतऐवजी शार्दूलचा समावेश

चार वेगवान आणि फिरकी अशा पाच गोलंदाजांसह खेळण्याचे सूत्र कोहली ओव्हलवरही कायम ठेवणार आहे. पण दोन सामन्यांत ५ बळी घेणाऱ्या अनुभवी इशांत शर्माऐवजी शार्दूल ठाकूरला संधी मिळू शकते. कारण शार्दूलची फलंदाजीही उपयुक्त ठरू शकेल. रूटचा अडसर; बटलरची विश्रांती इंग्लंडचा कर्णधार जो रूट भारतीय गोलंदाजांसाठी महत्त्वाचा अडसर ठरत आहे. शतकांची हॅट्ट्रिक नोंदवणाऱ्या रूटने तीन सामन्यांत एकूण ५०७ धावा केल्या आहेत. अश्विनला संधी मिळाल्यास रूटसाठी आव्हानात्मक ठरेल. डेव्हिड मलानने हेडिंग्लेला ७० धावांची खेळी साकारली. जोस बटलरने विश्रांती घेतल्यामुळे जॉनी बेअरस्टोकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी असेल.

भारताकडे असणारे पर्याय कोणते?

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयांक अगरवाल, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रित बुमरा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, के. एल. राहुल, वृद्धिमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, शार्दूल ठाकूर.

ओव्हलवरील एकंदरित परिस्थिती, खेळपट्टी पाहता भारत पाच फलंदाज, दोन फिरकी तर तीन जलदगती गोलंदाज या समिकरणासहीत मैदानात उतरण्याची शक्यता आहे. पुढील ११ खेळाडूंना आज भारतीय संघामध्ये स्थान मिळण्याची शक्यता अधिक आहे. रविंद्र जडेला संधी देण्यात आली नाही तर त्याच्या जागी शार्दूल ठाकूरला संधी मिळण्याची शक्यता आहे.

अशी असू शकते भारताची संभाव्य प्लेइंग ११ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रित बुमरा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

वेळ : दुपारी ३.३० वा.

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2021 11:59 am

Web Title: india vs england 4th test playing 11 prediction telecast details scsg 91
टॅग : Cricket Match
Next Stories
1 भारतासोबत क्रिकेटसाठी तालिबानचा हिरवा कंदील
2 पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा : नियमाच्या उल्लंघनामुळे सुयश जाधव अपात्र
3 प्रो कबड्डी लीग : प्रो कबड्डी लिलावाच्या अर्थकारणात ५.२८ टक्के घसरण
Just Now!
X