मालिका पराभवानंतर अखेरची कसोटी जिंकण्यासाठी विराटसेना उत्सुक; कुकला विजयी निरोप देण्याचा यजमानांचा निर्धार

लंडन : विजयाच्या अगदी जवळ येउनसुद्धा दोन कसोटींमध्ये पराभव स्वीकाराव्या लागलेल्या भारतीय संघाचे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात सन्मान राखण्याचेच लक्ष्य असणार आहे. त्यामुळे पाचव्या कसोटीपूर्वीच ३-१ अशा फरकाने मालिका गमावणारी विराटसेना निदान शेवटचा सामना जिंकून तरी दौऱ्याचा शेवट गोड करणार की, इंग्लंडचा संघ कारकीर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या अ‍ॅलिस्टर कुकला विजयी निरोप देणार, हे पाहणे रंजक ठरेल.

परदेशीभूमीवर सलग दोन मालिका गमावूनही (दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध) गेल्या १५-२० वर्षांतील हा सर्वोत्तम संघ आहे, अशी प्रतिक्रिया करणारे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे शब्द संघातील खेळाडू किती मनावर घेतात, यावरच या सामन्याचा निकाल ठरेल. खेळपट्टी पहिल्या चार कसोटींप्रमाणेच या वेळीही वेगवान गोलंदाजांच्या प्रेमात असेल, मात्र फिरकीपटूंनी मेहनत घेतल्यास त्यांनासुद्धा येथे यश मिळू शकते.

एकटय़ा कोहलीवर भार

भारताची मधली फळी कोहलीवर फार अवलंबून आहे. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांनी ठरावीक प्रमाणात त्याला योग्य साथसुद्धा दिली आहे, पण सातत्याचा अभाव त्यांच्याही कामगिरीत आढळत आहे. त्याशिवाय ऋषभ पंत व हार्दिक पंडय़ा यांनीही त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ करणे आवश्यक आहे.

कोहलीला खुणावताहेत दोन विक्रम!

कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान असणाऱ्या कोहलीला पाचव्या कसोटीत दोन विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. आतापर्यंतच्या चार कसोटींत ५४४ धावा ठोकणाऱ्या विराटला इंग्लंडमध्ये कोणत्याही कर्णधाराद्वारे एका मालिकेत सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम खुणावत आहे. इंग्लंडचे ग्रॅहम गूच यांच्या नावावर सध्या हा विक्रम असून १९९० मध्ये त्यांनी भारताविरुद्धच तीन कसोटींत तब्बल ७५२ धावा कुटल्या होत्या. कोहलीला हा विक्रम मोडीत काढण्यासाठी २०९ धावांची आवश्यकता आहे.

याव्यतिरिक्त, कोहलीला वेस्ट इंडिजचे महान फलंदाज सर गॅरी सोबर्स यांचा ५२ वर्षांपासून अबाधित असलेला विक्रम मोडण्याचीही संधी आहे. विदेशी कर्णधार म्हणून इंग्लंडच्या भूमीवर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सोबर्स यांच्या नावावर असून त्यांनी १९६६ साली पाच कसोटींत ७२२ धावा केल्या होत्या. कोहलीला हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी १७८ धावांची गरज आहे. कोहलीचा सध्याचा फॉर्म पाहता तो नक्कीच या दोघांपैकी एका तरी विक्रमाला गवसणी घालेल, अशी अपेक्षा सर्व क्रीडाप्रेमींना आहे.

कुकसाठी जिंकायचेय!

भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणार असल्याचे आधीच जाहीर करणाऱ्या कुकला आयुष्यातील अविस्मरणीय भेट देण्यासाठी आपण तयार आहोत, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा कर्णधार जो रूटने दिली आहे. त्यामुळे साहजिकच इंग्लंड व स्वत: कुकसाठी हा सामना भावनापूर्ण असणार आहे.

युवा पृथ्वी शॉला पदार्पणाची संधी?

भारतीय संघाची मालिका संपायला आली तरी सलामीची चिंता काही कमी झालेली नाही. मुरली विजयला शेवटच्या दोन कसोटीतून वगळण्यात आल्यावर शिखर धवन व लोकेश राहुल चांगली कामगिरी करतील, अशी अपेक्षा होती, मात्र त्यांनासुद्धा यात अपयश आहे. त्यामुळे पाचव्या कसोटीत विराट युवा पृथ्वी शॉ याला संघात स्थान देण्याचे धाडस करणार का, याकडे सर्वाच्या नजरा खिळल्या आहेत.

अश्विनच्या दुखापतीने जडेजाच्या आशा बळावल्या फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने बुधवारी सराव शिबिरात भाग न घेतल्याने रवींद्र जडेजाच्या या दौऱ्यावरील पहिलाच सामना खेळण्याच्या आशा बळावल्या आहेत. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय सामन्याच्या पूर्वीच घेतला जाईल, असे संघ व्यवस्थापनाने सांगितले.

संभाव्य संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमरा.

इंग्लंड : जो रूट (कर्णधार), अ‍ॅलिस्टर कुक, किटॉन जेनिंग्स, मोईन अली, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, जोस बटलर, ऑलिव्हर पोप, ख्रिस वोक्स, सॅम करन, आदिल रशीद, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.

* सामन्याची वेळ : दुपारी ३:३० वा.

* थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३