भारत-इंग्लंड यांच्यातील बहुप्रतीक्षित कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात

एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा २०११चे विजेतेपद मिळवल्यानंतर पहिल्याच मालिकेत इंग्लंडकडून ४-० असा सपाटून खाल्लेला मार, त्यानंतर २०१४च्या दौऱ्यात लॉड्सवरील दुसरी कसोटी जिंकूनही ३-१ अशी मालिका गमावण्याची नामुष्की ओढावून घेणे यामुळे, भारतीय क्रिकेट संघाची इंग्लंडमधील कामगिरी पाहिल्यास नेहमीच शरमेने मान खाली जाते. मात्र, कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या जिगरबाज ब्रिगेडला सहज हार मानण्याची सवय नाही. त्यामुळेच, बुधवारपासून सुरू होणाऱ्या प्रतिष्ठित पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत यंदा विजयी झेंडा रोवूनच भारतात परतण्याचे कोहलीसेनेचे लक्ष्य आहे. एजबस्टनच्या रणांगणावर रंगणाऱ्या या मालिकेच्या पहिल्या लढतीत भारतीय संघाचे एकच धोरण असेल ते म्हणजे आपला विजय व शत्रूची कोणत्याही परिस्थितीत हार.

कसोटी मालिकेपूर्वी उत्तम सराव व्हावा म्हणून भारताने ट्वेन्टी-२० व एकदिवसीय मालिकेचे आयोजन आधी केले. त्यानंतरही इंग्लंडमधील स्थानिक संघ इसेक्सशीही तीनदिवसीय सराव सामना खेळून स्वत:च्या जमेच्या व कमकुवत बाजूंची चाचपणी केली. तेव्हा इंग्लंडच्या वेगवान माऱ्यासमोर खेळण्यासाठी भारतीय फलंदाज किती सक्षम आहेत, याचे उत्तर लवकरच मिळेल. शिखर धवन व लोकेश राहुल यांच्यातून कोणाला मुरली विजयसह सलामी करण्याची संधी मिळते, हे पाहणे रंजक ठरेल. चेतेश्वर पुजाराने भारतीय उपखंड सोडल्यास लौकिकाला साजेशी कामगिरी केलेली नाही. मात्र, त्याच्यापेक्षाही सर्वाच्या नजरा खिळल्या आहेत त्या कर्णधार कोहलीवर. २०१४च्या दौऱ्यात पाच सामन्यांतून अवघ्या १३४ धावा करणारा कोहली यंदा इंग्लंडमधील आकडेवारी सुधारण्यावर नक्कीच भर देईल. दिनेश कार्तिकने सराव सामन्यात चांगली खेळी केल्यामुळे संघ व्यवस्थापनाची चिंता काहीशी कमी झालेली आहे.

अनुभवी इशांत शर्मा भारताच्या गोलंदाजीचे नेतृत्व करेल. जसप्रित बुमरा व भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत उमेश यादव आणि मोहम्मद शमी या भारताच्या कसोटीतील पारंगत गोलंदाजांवर त्याला साथ देण्याची मदार आहे. फिरकीपटू म्हणून पहिली पसंत रविचंद्रन अश्विनच असला तरी कुलदीप यादव त्याची जागा घेणार का, याचे उत्तर प्रत्यक्ष नाणेफेकीच्या वेळीच मिळेल. पाचव्या गोलंदाजाची भूमिका हार्दिक पंडय़ाला पेलावी लागणार आहे.

दुसरीकडे कर्णधार जो रूट स्वत: तुफान फॉर्मात असून त्याला अनुभवी अ‍ॅलिस्टर कुक व युवा किटॅन जेनिंग्स, डेव्हिड मलान व जॉनी बेअरस्टो कसे साथ देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. मालिका सुरू होण्याआधीच संघातील निवडीमुळे चर्चेत आलेल्या फिरकीपटू आदिल रशीद मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी सज्ज आहे. मात्र, संपूर्ण क्रीडाविश्वाला मुख्य आकर्षण आहे ते जेम्स अँडरसन व ख्रिस ब्रॉड या वेगवान जोडीचे. २०११ तसेच २०१४च्या दौऱ्यात या दोघांनी मिळून भारतीय फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले होते. त्यामुळे, कोहली आणि त्याचे सहकारी या जोडीसमोर कशी कामगिरी करतात, यावरच मालिकेचे भवितव्य अवलंबून आहे. एकूणच इंग्लंडच्या संघाचा हा १,००० वा कसोटी सामना असल्यामुळेही लढतीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तर अशा या ऐतिहासिक सामन्यात भारत विजय मिळवून मालिकेची सकारात्मक सुरुवात करणार की प्रथेप्रमाणे इंग्लंड भारताला नामोहरम करणार याकडे असंख्य चाहते लक्ष ठेवून आहेत.

वातावरण आणि खेळपट्टीचा अंदाज

जवळपास तीन महिन्यांनंतर इंग्लंडमध्ये सोमवारीच पावसाचे आगमन झाले असले तरी पहिल्या कसोटीवर त्याचे सावट पडण्याची शक्यता कमीच आहे. २६॰ सेल्सियस इतके तापमान स्टेडियमभोवतालच्या परिसरात असल्यामुळे खेळपट्टीकडून भारतीय फिरकीपटूंना साहाय्यता मिळण्याची शक्यता आहे. मात्र पहिल्या दोन दिवशी फलंदाजांचेच वर्चस्व राहील.

एजबस्टनचे मैदान काय सांगते?

  • सर्वाधिक धावसंख्या (एका डावात) : इंग्लंड – ७ बाद ७१० (डाव घोषित)(वि. भारत)
  • नीचांकी धावसंख्या (एका डावात) : दक्षिण आफ्रिका – सर्वबाद ३० (वि. इंग्लंड)
  • यशस्वी पाठलाग : दक्षिण आफ्रिका – ५ बाद २८३ (वि. इंग्लंड)
  • कमी धावसंख्येचा बचाव : ऑस्ट्रेलिया – सर्वबाद १२१ (वि. इंग्लंड)

तुम्हाला हे माहीत आहे का?

  • कोहलीने आतापर्यंत त्याने खेळलेल्या कसोटी संघांविरुद्ध त्यांच्याच देशात शतक ठोकले असून फक्त इंग्लंड या एकमेव संघाविरुद्धच त्याला अशी कामगिरी करता आलेली नाही.
  • इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला कसोटी कारकीर्दीतील ५५० बळींचा आकडा पूर्ण करण्यासाठी अवघ्या १० बळींची आवश्यकता आहे. ग्लेन मॅकग्रानंतर (५६३ बळी) अशी कामगिरी करणारा तो विश्वातील दुसरा वेगवान गोलंदाज ठरेल.
  • इशांत शर्माला कसोटी कारकीर्दीतील २५० बळींचा आकडा गाठण्यासाठी १२ बळींची आवश्यकता आहे. यापूर्वी भारताच्या सहा गोलंदाजांनी २५० हून अधिक बळी घेण्याची किमया साकारली आहे.
  • कसोटी कारकीर्दीत ४,००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी मुरली विजयला ९३ धावांची गरज आहे. या दौऱ्यात त्याने ही कामगिरी केल्यास भारतातर्फे ४,००० धावा करणाऱ्यांच्या यादीत तो १६वे स्थान मिळवेल.

संभाव्य संघ

  • भारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), हार्दिक पंडय़ा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव.
  • इंग्लंड : जो रूट (कर्णधार), अ‍ॅलिस्टर कुक, किटॉन जेनिंग्स, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो (यष्टिरक्षक), मोईन अली, आदिल रशीद, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, सॅम कुरान.

सामन्याची वेळ : दुपारी ३:३० वा.

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३