अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दिवस-रात्र कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फिरकीपटू अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांच्या जाळ्यात इंग्लंडचे खेळाडू एकामागोमाग अडकले. पहिल्या डावात इंग्लंडने ११२ तर भारताने १४५ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव अवघ्या ८१ धावांत आटोपला आणि भारताला ४९ धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान सलामीवीर रोहित शर्मा (२५*) आणि शुबमन गिल (१५) यांनी सहज पूर्ण केले, व अवघ्या दोनच दिवसात भारताने विजय मिळवला.

भारताच्या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावली डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलच्या गोलंदाजीने. त्याने पहिल्या डावात सहा आणि दुसऱ्या डावात पाच बळी घेत इंग्लंडच्या फलंजादांची अक्षरशः भंबेरी उडवली. अक्षरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. विजयाचा हिरो ठरलेल्या अक्षरने पुरस्कार स्वीकारताना, फलंदाजीत नाही तर किमान गोलंदाजीत तरी योगदान दिल्याचा आनंद आहे असं म्हटलं. यावेळी त्याला माजी क्रिकेटपटू मुरली कार्तिकने स्टंपमागून रिषभ पंत तुला वसिम भाई का बोलवतो हा प्रश्न विचारला.

Video: “ए बापू, थारी बॉलिंग…”; विराटचं गुजराती ऐकून हार्दिक, अक्षर हसून लोटपोट

“ते सगळे मला वसिम भाई म्हणतात कारण माझा आर्म बॉल वसिम भाई(वसिम अक्रम) टाकायचे त्याप्रमाणेच फलंदाजांसाठी घातक आहे असं त्यांना वाटतं. जेव्हा मी आर्म बॉल टाकतो तेव्हा, तू वसिम भाईप्रमाणेच आर्मबॉल टाकतोस असं पंत म्हणतो. अज्जू भाईने (अजिंक्य रहाणे) एकदा मला या नावाने हाक मारली आणि तेव्हापासून रिषभ पंत त्याच नावाने हाक मारतो”, असा खुलासा अक्षर पटेलने केला.

Ind vs Eng: अरेरे… इंग्लंडच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद

दरम्यान, या विजयासह भारताने मालिकेत २-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर भारतीय संघ विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.