इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात डेव्हिड मलानला बाद केल्यानंतर सेलिब्रेशन करताना मर्यादा ओलांडल्याने इशांत शर्माला दंड ठोठावण्यात आला आहे. इशांतला मानधनातील १५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागेल, अशी माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्यावतीने (आयसीसी) देण्यात आली.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इशांत शर्माने दमदार कामगिरी केली. त्याने या सामन्यात सहा विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात त्याने इंग्लंडच्या पाच फलंदाजांना माघारी पाठवले. यामुळे इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या १८० धावांवर आटोपला. या सामन्यात भारताचा पराभव झाला असला इशांतची कामगिरी क्रिकेटप्रेमींना दिलासा देणारी होती.

सामना संपल्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी इशांत शर्माला १५ टक्के दंड आकारला. सामन्याच्या मानधनातील १५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागेल. तसेच त्याच्या वर्तनासाठी मानांकनात १ डिमेरिट गुणही जमा होणार आहे.
दुसऱ्या डावात इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलानला २० धावांवर बाद केल्यानंतर इशांत शर्माने मलानकडे बघून आक्षेपार्ह हातवारे केले होते. आयसीसीच्या आचार संहितेच्या कलम २.१७ चा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.