इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराला भारतीय संघात स्थान मिळाले. मात्र, या सामन्यात चेतेश्वर पुजारा फक्त एक रन काढून धावबाद झाला. पुजारा गेल्या दोन वर्षांत कसोटीत पाचव्यांदा धावबाद झाला असून खेळपट्टीवर पळताना पुजाराकडून अक्षम्य हलगर्जीपणा होत असल्याची टीका होत आहे.

इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत शिखर धवनला वगळून चेतेश्वर पुजाराला संघात संधी देण्यात आली. पुजाराकडून क्रिकेटप्रेमींना अपेक्षाही होत्या. पण शुक्रवारी त्यांचा हिरमोड झाला. चेतेश्वर पुजारा २५ चेंडूत फक्त १ रन करुन माघारी परतला. रन काढताना कोहली आणि पुजाराचा गोंधळ उडाला. यात कोहलीही कारणीभूत असला तरी शेवटी पुजारा बाद झाला. गेल्या दोन वर्षात कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे फलंदाज सात वेळा धावबाद झाले. यातील पाच वेळा धावबाद होण्याचा विक्रम पुजाराच्या नावावर जमा झाला आहे.

शुक्रवारी पुजारा बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये बसलेले मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या चेहऱ्यावरील नाराजी लपत नव्हती. शुक्रवारी कोहलीच्या चुकीमुळे पुजारा बाद झाला यात काही अंशी तथ्य असले तरी शेवटी पुजाराच्या धावबाद होण्यामुळे संघाचे नुकसानच होत आहे. इंग्लंडसारख्या महत्त्वपूर्ण दौऱ्यात पुजारावर पुन्हा धावबाद होण्याची वेळ येऊ नये, अशी आशा आहे.

कसोटीत गेल्या दोन वर्षांत धावबाद झालेल्या भारतीय फलंदाजांची यादी
१. भारत विरुद्ध इंग्लंड, लॉर्ड्स – २०१८
चेतेश्वर पुजारा एक रन काढून धावबाद.

२. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरिअन, जानेवारी २०१८
चेतेश्वर पुजारा १९ रन करुन धावबाद, याच कसोटीतील पहिल्या डावातही पुजारा शून्यावर धावबाद झाला होता. एकाच कसोटीतील दोन्ही डावांमध्ये धावबाद होणारा पुजारा पहिला भारतीय फलंदाज.

३. भारत विरुद्ध श्रीलंका, कोलंबो, ऑगस्ट २०१७
लोकेश राहुल ५७ धावांवर धावबाद.

४. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, धर्मशाला, मार्च २०१७
पुजारा शून्यावर धावबाद

५. भारत विरुद्ध न्यूझीलंड, इंदौर, ऑक्टोबर २०१६
मुरली विजय १९ धावा करुन माघारी. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न विजयचा प्रयत्न. पण पुजाराने त्याला माघारी जाण्याचा इशारा केला. मात्र तोवर विजय खूप पुढे आला आणि ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षकानी ही संधी न गमावता विजयला धावबाद केले.

६. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, किंगस्टन, जुलै २०१६
४६ धावांवर असताना पुजारा धावबाद.

२०१६ पूर्वी पुजारा डिसेंबर २०१३ मध्ये जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत २५ धावांवर डिसेंबर २०१२ मध्ये कोलकाता येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत धावबाद झाला होता.