टीम इंडियाविरुद्ध कसोटी आणि टी२० मालिका गमावल्यानंतर इंग्लंडला पहिल्या एकदिवसीय सामन्यातही ६६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आज(दि.२६) होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत आव्हान जिवंत राखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गनने दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर झाला आहे.

भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना मॉर्गनच्या उजव्या हाताच्या दोन बोटांना दुखापत झाली होती. त्यावर चार टाके मारण्यात आले आहेत. मॉर्गनच्या अनुपस्थितीत जोस बटलरकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेट मंडळाकडून याबाबत माहिती देण्यात आली. याशिवाय फलंदाज सॅम बिलिंग्स देखील दुसऱ्या सामन्यासाठी अनुपलब्ध असणार आहे. पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान सीमारेषेवर एक चौकार अडवताना बिलिंग्स जायबंदी झाला होता. त्याच्या गळ्याच्या हाडाला दुखापत झाली. परंतु तिसऱ्या सामन्यात त्याच्या खेळण्याची आशा आहे. लियाम लिव्हिंगस्टोनला इंग्लंडकडून एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

तर, भारताकडून पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाल्याने सूर्यकुमार यादवच्या एकदिवसीय पदार्पणाचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. शिवाय, सलामीवीर रोहित शर्माच्या कोपराला दुखापत झाली असली तरी तो दुसऱ्या सामन्यासाठी तंदुरुस्त असेल, असे सांगण्यात येत आहे. सलामीवीर शिखर धवनला गवसलेला सूर हे पहिल्या सामन्याचे फलित म्हणता येईल. ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेतील पहिल्याच सामन्यात अपयशी ठरल्यामुळे धवनला उर्वरित दोन सामन्यांत वगळण्यात आले होते. परंतु एकदिवसीय मालिकेत मात्र ९८ धावांच्या खेळीसह दिमाखदार सलामी त्याने दिली आहे. पहिल्या सामन्यात ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादव महागडा ठरला. त्याने नऊ षटकांत ६८ धावा दिल्या. त्यामुळे कुलदीपच्या जागी लेग-स्पिनर यजुवेंद्र चहलचा संघात समावेश होऊ शकेल. पहिल्या सामन्यात भुवनेश्वर कुमार, कृष्णा आणि शार्दूल ठाकूर या वेगवान त्रिकुटाने १० पैकी ९ बळी मिळवत इंग्लंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. त्यामुळे टी. नटराजन किंवा मोहम्मद सिराज यांना संधीसाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

संघ
* भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, थंगरासू नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा.

* इंग्लंड : जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, सॅम बिलिंग्स, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार-यष्टिरक्षक), मोईन अली, सॅम करन, टॉम करन, लिआम लिव्हिंगस्टोन, मॅट पार्किन्सन, आदिल रशीद, रीसी टॉप्ले, मार्क वूड.

* वेळ : दुपारी १.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि एचडी वाहिन्या.