News Flash

IND vs ENG: पाचव्या टी-20 सामन्यात भारताचा इंग्लंडला ‘दणका’

टी-20 मालिकेत भारताची इंग्लंडवर 3-2ने बाजी

अतिशय रंगतदार झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यात भारताने इंग्लंडला 36 धावांनी मात देत पाच सामन्यांची मालिका 3-2 अशी खिशात घातली. इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गनने या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारतानेही इंग्लंडच्या निर्णयाचे स्वागत करत इंग्लंडसमोर 224 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची अर्धशतके आणि सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्या फटकेबाजीमुळे भारताला दोनशेपार पोहोचता आले. प्रत्युत्तरात खेळणाऱ्या इंग्लंडने जोस बटलर आणि डेव्हि़ड मलान यांच्या अर्धशतकांच्या जोरावर कडवा संघर्ष केला. मात्र, सामन्याच्या उत्तरार्धात भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या दमदार प्रदर्शनामुळे  इंग्लंडला निर्धारित 20 षटकात 8 बाद  188  धावांपर्यंतच पोहोचता आले. भुवनेश्वर कुमारला सामनावीर तर, विराट कोहलीला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

इंग्लंडचा डाव

भारताच्या 225 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. भुवनेश्वर कुमारच्या पहिल्या षटकात जेसन रॉय बाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर डेव्हिड मलान फलंदाजीला आला. त्याने हार्दिक पंड्याच्या पहिल्याच षटकात फटकेबाजीला सुरुवात केली. पंड्याला पहिल्याच षटकात 18 धावा मोजाव्या लागल्या. पहिल्या विकेटनंतर कोणताही दबाव न घेता  जोस बटलर-डेव्हिड मलानने भारताच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. इंग्लंडने चार षटकात 41 धावा जोडल्या.  तर, पाचव्या षटकात इंग्लंडने आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताचे फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर आणि राहुल चहर यांच्या षटकातही बटलरने खूप धावा वसूल केल्या. त्यानंतर मोठे फटके, दुहेरी धावा यांचे सुंदर मिश्रण करत या दोघांनी दहाव्या षटकात संघाचे शतक पूर्ण केले.  डेव्हिड मलानने 33 चेंडूत मालिकेतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. मलानपाठोपाठ बटलरने 30 चेंडूत अर्धशतक साकारले.

हे दोघे भारतासाठी चिंता ठरत असताना भुवनेश्वर मदतीसाठी धावून आला. त्याने बटलरला पंड्याकरवी झेलबाद केले. आपल्या 52 धावांच्या खेळीत बटलरने 4 षटकार आणि 2 चौकारांची आतषबाजी केली. बटलरनंतर शार्दुल ठाकूरने जॉनी बेअरस्टोला माघारी धाडत इंग्लंडला अडचणीत टाकले. बेअरस्टोने 7 धावा केल्या.  त्यानंतर दबावात खेळणारा मलानही शार्दुलचा बळी ठरला. त्याने 9 चौकार आणि 2 षटकारांसह 68 धावांची खेळी केली. कर्णधार मॉर्गनकडून चमत्कारिक खेळीची अपेक्षा होती. मात्र, तोही अपयशी ठरला. त्याला पंड्याने झेलबाद केले.यानंतर इंग्लंडची विजयाची आशा मावळली. भारताकडून शार्दुल ठाकूरला  तीन, भुवनेश्वरला दोन तर, नटराजन  आणि पंड्या यांना प्रत्येकी एक बळी घेता आला. भुवनेश्वरने 4 षटकात 15 धावाच देत दोन महत्त्वाचे गडी गारद केले.

भारताचा डाव

भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 224 धावा उभारल्या. टी-20 क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्धची ही भारताची सर्वोत्तम धावसंख्या ठरली.  क्रिकेटच्या या प्रकारात प्रथमच सलामी देण्यासाठी विराट आणि रोहित मैदानात उतरले. आदिल रशीदने इंग्लंडसाठी पहिले षटक टाकले. या षटकात रशीदने तीनच धावा दिल्या. पुढच्या षटकात भारताच्या सलामीवीरांनी आर्चरला दोन  चौकार खेचले. पाच षटकात या दोघांनी 44 धावा फलकावर लावल्या. पुढच्या षटकात मार्क वूडला षटकार ठोकत विराटने संघाचे अर्धशतक पूर्ण केले. यानंतर रोहितने आक्रमक फटकेबाजी करत संघाची धावगती वाढवली. आठव्या षटकात सॅम करनला अप्रतिम षटकार ठोकत रोहितने अर्धशतक पूर्ण केले. अवघ्या 30 चेंडूत रोहितने आपले अर्धशतक साकारले. रोहित मोठी खेळी करणार असे वाटत असताना बेन स्टोक्सने त्याला बाद केले. रोहितने 34 चेंडूत 5 षटकार आणि 4  चौकार ठोकत 64 धावा केल्या.

रोहितनंतर सूर्यकुमार-हार्दिक आक्रमक

विराट-रोहितने 94 धावांची यशस्वी सलामी दिली. या मालिकेतील ही भारताची सर्वोत्तम सलामी होती. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने रशीदला षटकार ठोकत दहाव्या षटकात  भारताचे शतक फलकावर लावले. सूर्यकुमारने मागील सामन्यातील फॉर्म कायम राखत इंग्लंडवर आक्रमण केले. इंंग्लंडच्या बाराव्या षटकात या दोघांनी ख्रिस जॉर्डनला चार चौकार खेचले. अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या सूर्यकुमारला आदिल रशीदने बाद केले. मोठा फटका खेळलेल्या सूर्यकुमारचा ख्रिस जॉर्डनने सीमारेषेवर सुरेख झेल घेतला.  त्याने 17 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 32 धावा केल्या. त्यानंतर पंधराव्या षटकात हार्दिक पंड्या-विराट कोहलीने संघाचे दीडशतक पूर्ण केले. सलामीला आलेल्या विराटने 16व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या षटकापर्यंत या दोघांनी हाणामारी सुरूच ठेवली. 18व्या षटकात भारताने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डन आणि मार्क वूड महागडे ठरले. जॉर्डनला 4 षटकात 57 तर वूडला 53 धावा कुटल्या गेल्या. आदिल रशीद आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

कोण आत कोण बाहेर?

या सामन्यासाठी विराट कोहलीने संघात मोठा बदल केला होता. लोकेश राहुलच्या बदली संघात यॉर्कर स्पेशलिस्ट टी. नटराजनला संघात स्थान देण्यात आले. विशेष म्हणजे, विराट आणि रोहितने  या सामन्याद्वारे प्रथमच टी-20 प्रकारात सलामी दिली.  दुसरीकडे, इंग्लंडने आपला मागील सामन्यातील संघ या सामन्यात कायम राखला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 6:33 pm

Web Title: india vs england fifth t20 match report adn 96
Next Stories
1 भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत नसणार आर्चर?
2 ”यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडला अनेक संघ घाबरतील”
3 बॉस्फोरस बॉक्सिंग: निखत झरीन आणि गौरव सोलंकीला कांस्य
Just Now!
X