ऋषिकेश बामणे – response.lokprabha@expressindia.com

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका भारत ४-० अशा फरकाने जिंकेल! विराट कोहलीच्या पुनरागमनाने भारताची ताकद वाढली असून इंग्लंडला एक कसोटी जिंकणेदेखील कठीण जाईल! अशा आशयाची मते भारताच्या काही माजी क्रिकेटपटूंनी इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी व्यक्त केली होती; परंतु चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर भलतेच घडले. संपूर्ण तयारीनिशी भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडने सर्व दावे फोल ठरवून ५ ते ९ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या पहिल्या कसोटीत भारताला २२७ धावांनी सहज धूळ चारली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या यशाच्या धुंदीत मश्गूल झालेल्या भारतीय खेळाडूंना खडाडून जाग आली असेल, अशी आशा आहे.

इतिहासावर नजर टाकल्यास गेल्या १० वर्षांत इंग्लंडने भारताला नेहमीच कडवी झुंज दिल्याचे निदर्शनास येते. अपवाद फक्त २०१७-१८च्या कसोटी मालिकेचा. २०११ मध्ये विश्वचषक विजयानंतर इंग्लंडला गेलेल्या भारताला ०-४ अशा फरकाने कसोटी मालिका गमवावी लागली. त्याहूनही लाजिरवाणी गोष्ट म्हणजे २०१२ मध्ये इंग्लंडने भारतात येऊनच आपल्याला २-१ असे नमवले. भारताला त्यांच्याच मायदेशात कसोटी मालिकेत पराभूत करणारा इंग्लंड हाच शेवटचा संघ. २०१४-१५ आणि २०१८-१९च्या इंग्लंड दौऱ्यात इंग्लंडने भारताला अनुक्रमे ३-१ आणि ४-१ अशी धूळ चारली. त्यामुळेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताला पूर्ण तयारी करण्याबरोबरच सावधानताही बाळगावी लागते, हे दिसून आले आहे.

पहिल्या कसोटीत नाणेफेकीपासूनच गोष्टी आपल्यासाठी प्रतिकूल ठरल्या. सामन्याच्या एका दिवसापूर्वीच इंग्लंडचे फलंदाजी प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी पहिल्या डावात किमान ५००हून अधिक धावा करण्याचे उद्देश असल्याचे सांगितले होते. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने त्यांचे विधान खरे ठरवले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने ५७८ धावांचा डोंगर उभारला. रूटने दिमाखदार द्विशतक झळकावून भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. पहिले दोन्ही दिवस क्षेत्ररक्षण केल्यामुळे भारताचे फलंदाजही थकले आणि याचाच प्रभाव फलंदाजीदरम्यानही दिसून आला. चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी झुंजार अर्धशतके साकारल्याने भारताने किमान ३३७ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडने पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी मिळवूनही भारतावर (फॉलोआन) लादला नाही.

दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विनच्या फिरकीमुळे भारताने इंग्लंडला १७८ धावांत गुंडाळले; परंतु यासाठी इंग्लंडने फक्त ३५ षटके घेतल्याने त्यांनी भारतापुढे एकूण ४२० धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३२४ धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठणारा भारतीय संघ घरच्या मैदानावर जवळपास १०५ षटकांत हे लक्ष्यसुद्धा नक्कीच साध्य करेल, अशी अपेक्षा चाहत्यांना होती. चौथ्या दिवसअखेर भारताने रोहित शर्माच्या मोबदल्यात १ बाद ३९ धावा केल्या. त्यामुळे अखेरच्या दिवशी भारतापुढे नऊ फलंदाजांसह ३८१ धावांचे शिखर सर करण्याचे आव्हान होते.

मात्र अखेरच्या दिवशी खेळाला प्रारंभ झाल्यावर भारताचे रथी-महारथी एकामागून एक तंबूत परतले. भरवशाचा चेतेश्वर पुजारा लवकर माघारी परतल्यानंतरही शुभमन गिलने जिगरबाज वृत्तीने फलंदाजी करत अर्धशतक झळकावले; परंतु जेम्स अँडरसनचे गोलंदाजीसाठी आगमन झाले आणि सामन्याला कलाटणी मिळाली. ६००हून अधिक कसोटी बळींचा अनुभव असलेल्या अँडरसनने गिल आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा एकाच षटकात अप्रतिम इनस्विंग चेंडूवर त्रिफळा उडवला. त्यानेच धोकादायक ऋषभ पंतलाही बाद केले. वॉशिंग्टन सुंदरही भोपळा न फोडताच माघारी परतल्याने भारताचा पराभव अटळ झाला. कर्णधार विराट कोहलीने एक बाजू सांभाळून ७२ धावा नक्की केल्या; परंतु तळाच्या फलंदाजांसह सामना अनिर्णित राखणेही त्याच्यासाठी फार कठीण होते. अखेर बेन स्टोक्सच्या चेंडूवर कोहलीचा त्रिफळा उडाला आणि भारताच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले. या विजयासह इंग्लंडने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आणि शनिवार, १३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीपूर्वी भारताला धोक्याचा इशारा दिला.

या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी स्वैर मारा करण्याबरोबरच असंख्य अतिरिक्त धावाही दिल्या. त्याशिवाय संघनिवडीतदेखील कोहलीकडून चूक झाली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. इंग्लंडचे फलंदाज मनगटी फिरकीपटूंविरुद्ध नेहमीच चाचपडतात. त्यामुळे शाहबाझ नदीमऐवजी कुलदीप यादवला संधी देता आली असती. कारण एकीकडून अश्विन आणि जसप्रीत बुमरा बळी मिळवत असताना दुसऱ्या बाजूने कोणी तरी धावा रोखून धरण्याचे कार्य करणे गरजेचे होते. त्याचप्रमाणे रहाणे आणि रोहित यांनी फलंदाजीत अधिक जबाबदारीने खेळ केल्यास कोहली आणि पुजारावरील दडपणही कमी होईल.

तूर्तास मात्र भारताने गेल्या काही महिन्यांत दाखवलेली जिद्द आणि चिकाटीमुळे ते आताही दमदार पुनरागमन करतील, अशी अपेक्षा आहे. पहिली कसोटी गमावल्यामुळे आता भारताची खरी अग्निपरीक्षा असेल. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत प्रेक्षकांच्या उपस्थितीत भारत या अग्निपरीक्षेत उत्तीर्ण होणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

पुनरागमन करण्यात पटाईत!

दडपणाच्या परिस्थितीतही भारत झोकात पुनरागमन करू शकतो, हे आपण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाहिले. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांतसुद्धा भारत नक्कीच पुनरागमन करेल, असे मला वाटते. इंग्लंड त्यांच्या सर्वोत्तम खेळाडूंसह खेळत असून त्यांनाही जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान गाठायचे आहे. त्यातच पहिल्या कसोटीतील विजयासह त्यांचा आत्मविश्वास बळावला असल्याने भारताला आता थोडी सावधानता बाळगून खेळणेही गरजेचे आहे. दुसऱ्या कसोटीत चेपॉकच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना अधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. रविचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांचे अंतिम ११ खेळाडूंतील स्थान पक्के असल्याने भारताने तिसरा फिरकीपटू म्हणून शाहबाझ नदीमऐवजी कुलदीप यादव किंवा अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला संधी द्यावी. फलंदाजीत कर्णधार विराट कोहलीसह रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. शुभमन गिल, ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांच्या कामगिरीने मी प्रभावित झालो असून त्यांनी या पुढील सामन्यांतसुद्धा नैसर्गिक खेळ कायम राखावा.

– चंद्रकांत पंडित, भारताचे माजी क्रिकेटपटू

सौजन्य – लोकप्रभा