नॉटिंगहॅममध्ये भारत आणि इंग्लंड संघात पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हाच निर्णय त्याच्या अंगउलट आला. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ १८३ धावांत सर्वबाद झाला आहे. कर्णधार जो रूट वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ४ बळी तर शमीने ३ बळी घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंग्लंडचा डाव

इंग्लंडकडून रोरी बर्न्स आणि झॅक क्रॉले यांनी सलामी दिली. भारताचा तेजतर्रार गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला. बर्न्सला बुमराहने शून्यावर पायचित पकडले. बर्न्सने पाच चेंडू खेळले, पण त्याला एकही धाव घेता आली नाही. बर्न्सनंतर झॅक क्रॉले मैदानात आला. तो स्थिरावला असताना मोहम्मद सिराजने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. क्रॉलेने ४ चौकारांसह २७ धावा केल्या.

उपाहारानंतर डॉमिनिक सिब्ले वैयक्तिक १८ धावांवर माघारी परतला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याला राहुलकरवी झेलबाद केले. त्यानंतर  जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडच्या डावाला आधार दिला. या दोघांनी ७२ धावांची भागीदारी रचली. चहापानापर्यंत जो रूटने आपले अर्धशतक पूर्ण केले. तर  शमीच्या गोलंदाजीवर बेअरस्टो माघारी परतला. त्याने २९ धावा केल्या.  चहापानानंतर इंग्लंडची एक बाजू सांभाळणारा रूट माघारी परतला. रूटने ११ चौकारांसह ६४ धावांची खेळी केली. मुंबईकर गोलंदाज शार्दुल ठाकूरने त्याला पायचित पकडले. त्यानंतर एका बाजूने इंग्लंडचे फलंदाज बाद होत गेले. सॅम करनने ४ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २७ धावांची आतषबाजी खेळी करत सामन्यात रंगत निर्माण केली. बुमराहने जेम्स अँडरसनची दांडी गुल करत इंग्लंडचा डाव संपवला. त्याने ४६ धावांत ४ बळी घेतले. मोहम्मद शमीला ३ आणि शार्दुल ठाकूरला २ बळी घेता आले.

 

हेही वाचा – IND vs ENG : जो रूटनं रचला इतिहास, इंग्लंडसाठी केला मोठा पराक्रम!

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारतीय संघ – रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, केएल राहुल.

इंग्लंडचा संघ – जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉमिनिक सिबली, जोस बटलर, सॅम करन, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, झॅक क्रॉली, ओली रॉबिन्सन.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs england first test englands first inning report adn
First published on: 04-08-2021 at 21:53 IST