नॉटिंगहॅममध्ये भारत आणि इंग्लंड संघात पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाच्या चहापानापर्यंत इंग्लंडने ५०.२ षटकात ४ बाद १३८ धावा केल्या आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेला पराभव विसरून भारतीय संघ नव्या हंगामाची सुरुवात विजयाने करू इच्छित आहे. या व्यतिरिक्त, विराटसेना इंग्लंडच्या भूमीवर पहिली मालिका जिंकण्यासाठी आतूर असेल.

चहापानापर्यंत इंग्लंड

उपाहारानंतर डॉमिनिक सिब्ले वैयक्तिक १८ धावांवर माघारी परतला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याला राहुलकरवी झेलबाद केले. त्यानंतर  जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडच्या डावाला आधार दिला. या दोघांनी ७२ धावांची भागीदारी रचली. चहापानापर्यंत जो रूटने आपले अर्धशतक पूर्ण केले. तर  शमीच्या गोलंदाजीवर बेअरस्टो माघारी परतला. त्याने २९ धावा केल्या. दुसऱ्या सत्राचा खेळ संपला तेव्हा रूट ९ चौकारांसह ५२ धावांवर नाबाद होता.

 

उपाहारापर्यंत इंग्लंडची वाईट अवस्था

इंग्लंडकडून रोरी बर्न्स आणि झॅक क्रॉले यांनी सलामी दिली. भारताचा तेजतर्रार गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला. बर्न्सला बुमराहने शून्यावर पायचित पकडले. बर्न्सने पाच चेंडू खेळले, पण त्याला एकही धाव घेता आली नाही. बर्न्सनंतर झॅक क्रॉले मैदानात आला. तो स्थिरावला असताना मोहम्मद सिराजने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. क्रॉलेने ४ चौकारांसह २७ धावा केल्या. उपाहारापर्यंत डॉमिनिक सिब्ले १८ आणि कर्णधार जो रूट १२ धावांवर नाबाद होते.

कोण आत कोण बाहेर?

फिरकीपटू आर. अश्विन आणि इशांत शर्मा यांना या कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. दुसरीकडे, केएल राहुल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज यांना संधी मिळाली आहे. रवींद्र जडेजाचा फिरकीपटू म्हणून संघात समावेश आहे. भारतीय संघ चार वेगवान गोलंदाजांसह हा सामना खेळणार आहे, तर इंग्लंडने त्यांच्या संघात एकाही फिरकी गोलंदाजाचा समावेश केलेला नाही.

हेही वाचा – भिडल्या… लढल्या! अटीतटीच्या झुंजीत अर्जेंटिनाचा विजय; भारताची आता कांस्यपदकावर नजर

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारतीय संघ – रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, केएल राहुल.

इंग्लंडचा संघ – जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉमिनिक सिबली, जोस बटलर, सॅम करन, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, झॅक क्रॉली, ओली रॉबिन्सन.