भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेचा चौथा सामना रंगत आहे. या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 8 बाद 185 धावा केल्या आहेत. मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवचे तुफानी अर्धशतक आणि श्रेयस अय्यरच्या झटपट खेळीमुळे टीम इंडियाला दोनशे धावांच्या जवळ पोहोचता आले. मागील सामन्यात पराभव झाल्याने विराटसेनेला मालिका वाचवण्यासाठी या सामन्यात विजय आवश्यक आहे. इंग्लंडने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

प्रत्युत्तरात खेळताना इंग्लंडने आपला पहिला गडी जोस बटलरच्या रुपात गमावला. भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर तो चहरकडे झेल देऊन बाद झाला. त्याने 9 धावा केल्या.  बटलर बाद झाल्यानंतरही सलामीवीर जेसन रॉयने आपली आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली. टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला डेव्डिह मलान या सामन्यात अपयशी ठरला. राहुल चहरने त्याची 14 धावांवर दांडी गुल केली. मलानपाठोपाठ जेसन रॉयही माघारी परतला. हार्दिक पंड्याने त्याचा काटा काढला. रॉयने 6 चौकार आणि एका षटकाराहसह 40 धावा केल्या. मात्र, मॅच रंगतदार स्थितीत पोहोचली असून शार्दूल ठाकूरच्या एकाच ओव्हरमध्ये बेयरस्टो आणि कर्णधार मॉर्गन या दोन मोठ्या विकेट्स मिळाल्यामुळे मॅच भारताच्या बाजूने झुकली. त्याच्या पुढच्याच १८व्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्यानं सॅम करनला माघारी धाडल्यामुळे इंग्लंडचा स्कोअर ७ विकेट्सच्या मोबदल्यात १५३ पर्यंत पोहोचला.

भारताचा डाव

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली.  रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. तर, फिरकीपटू आदिल रशीदने इंग्लंडसाठी पहिले षटक टाकले. रोहितने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत आपला इरादा स्पष्ट केला. रशीदच्या पहिल्याच षटकात रोहित-राहुलने 12 धावा वसूल केल्या. रोहित-राहुल स्थिरावणार असे वाटत असताना आर्चरने रोहितला झेलबाद केले. सामन्याच्या चौथ्या षटकात  रोहित बाद झाला. त्याने एक चौकार आणि एका षटकारासह 12 धावा केल्या.

सूर्यकुमारची भन्नाट सुरुवात

रोहितनंतर आलेल्या सूर्यकुमारनेही आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर सूर्यकुमार-राहुलने आक्रमक फलंदाजी करत भारताची धावसंख्या वाढवली. सातव्या षटकात टीम इंडियाने आपले अर्धशतक पूर्ण केले.  मागील दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या राहुलकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, त्याला आर्चरने 14 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेला विराट कोहलीही एक धाव काढून बाद झाला. त्याला रशीदने तंबूत धाडले. या पडझडीनंतर ऋषभ पंतला साथीला घेत सूर्यकुमारने किल्ला लढवला. त्याने 28 चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. त्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादात तो झेलबाद झाला. 31 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांची आतषबाजी करत सूर्यकुमारने 57 धावा फटकावल्या.

त्यानंतर श्रेयस अय्यर मैदानात आला. त्याने पंतसह संघाची धावसंख्या पुढे नेली.  छोटेखानी भागीदारी उभारल्यानंतर पंत बाद झाला. आर्चरने त्याला 30 धावांवर आऊट केले. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि हार्दिक पंड्या यांनी शेवटच्या षटकात फटकेबाजी केली. मोठा फटका खेळण्याच्या नादात हार्दिक पंड्या 11 धावांवर झेलबाद झाला. बेन स्टोक्सने त्याचा ऑफ साईडला भन्नाट झेल टिपला. पंड्या बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरही खेळपट्टीवर जास्त काळ टिकला नाही. अय्यरने 18 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकारासह 37 धावांची खेळी केली.  इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने 4 तर, आदिल रशीद, मार्क वूड, सॅम करन आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

कोण आत कोण बाहेर?

आजच्या सामन्यासाठी ईऑन मॉर्गनने संघात कोणताही बदल केलेला नाही. भारतीय संघात मात्र दोन बदल करण्यात आले आहेत.  दुखापतग्रस्त इशान किशनच्या बदली सूर्यकुमार यादवला संघात स्थान देण्यात आले आहे. तर, फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलच्या जागी फिरकी गोलंदाज राहुल चहर संघात आला आहे. भारताच्या गोलंदाजांच्या फळीत  चहल दोन्ही पराभूत सामन्यांत महागडा ठरला होता.

 

प्लेईंग XI –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर.

इंग्लंड : ईऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, आदिल रशीद, ख्रिस जॉर्डन, सॅम करन, मार्क वूड, जोफ्रा आर्चर.