विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत पहिल्या पाच सामन्यांत विजयी घोडदौड राखणाऱ्या भारतीय संघाने रविवारी इंग्लंडकडून पहिला पराभव पत्करला आणि संघाची फसलेली रणनीती चर्चेत आली. भारतीय फलंदाजांकडून संथ सुरुवात आणि चक्रावून टाकणारा शेवट यावर माजी क्रिकेटपटूंसह चाहत्यांकडून टीका केली जात आहे.

महेंद्रसिंह धोनी (३१ चेंडूंत नाबाद ४२ धावा) आणि केदार जाधव (१३ चेंडूंत नाबाद १२) यांनी अखेरच्या पाच षटकांत आक्रमक खेळीची आवश्यकता असताना केलेली संथ फलंदाजी ही टीकेच्या लक्ष्यस्थानी आहे.

रविवारी झालेल्या सामन्यात भारताने इंग्लंडकडून ३१ धावांनी पराभव पत्करला. या सामन्यात इंग्लंडचे ३३८ धावांचे लक्ष्य पेलताना पहिल्या ‘पॉवरप्ले’च्या १० षटकांत भारताने जेमतेम एक बाद २८ धावा काढल्या. यात २८ निर्धाव चेंडू आणि पाच चौकारांचा समावेश होता. धावांचा हा आलेख भारतीय फलंदाजांना पुढे वाढवता आला नाही. भारताला अखेरच्या पाच षटकांत ७१ धावांची आवश्यकता होती. परंतु मैदानावर असलेल्या धोनी आणि जाधवने फक्त ३९ धावाच केल्या. या पाच षटकांत चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित होती. परंतु या जोडीने तीन चौकार आणि एक षटकारच जेमतेम मारला. भारताच्या एकंदर डावातील हा एकमेव षटकार ५०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धोनीला मारता आला. या शेवटच्या ३० चेंडूंपैकी २० चेंडू धोनी-केदारने एकेरी धावेसाठी खर्ची घातले. कठीण प्रसंगात खेळपट्टीवर खंबीरपणे उभा राहणारा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज धोनी ‘ग्रेट फिनिशर’ म्हणजेच असामान्य विजयवीर म्हणून ओळखला जातो. परंतु त्याच्या फलंदाजीच्या दृष्टिकोनाबाबत अनेक माजी क्रिकेटपटूंनी तोफ डागली आहे. यात सौरव गांगुली, नासीर हुसैन आणि संजय मांजरेकर यांचा समावेश आहे. मी पूर्णत: गोंधळून गेलो, हे काय चालले आहे, असा सवाल हुसैन यांनी विचारला. शेवटच्या काही षटकांतील धोनीचा चक्रावून टाकणारा दृष्टिकोन त्यासाठी कारणीभूत आहे, असे मांजरेकरने म्हटले आहे. परंतु कर्णधार विराट कोहलीने धोनीची पाठराखण केली आहे.

पाकिस्तानात निराशा

विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडकडून भारताने पराभव पत्करल्याने पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या आशिया खंडांतील संघांच्या उपांत्य फेरीच्या आशा धूसर झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून भारतीय खेळाडूंवर टीका होत आहे. अखेरच्या षटकांतील सुमार खेळामुळे भारतीय खेळाडूंच्या खिलाडू वृत्तीवर वकार युनूस आणि शोएब अख्तर या माजी क्रिकेटपटूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

रणनीती ?

इंग्लंडविरोधातील सामना भारतीय खेळाडूंनी जाणीवपूर्वक गमावला आहे कारण त्यामुळे उपांत्य फेरीत पाऊल टाकणे पाकिस्तानला अवघड झाले आहे, असे मत काही खेळाडू आणि चाहत्यांकडून व्यक्त होत आहे. हा सामना गमावूनही भारताला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यास कोणतीही आडकाठी नाही. भारताला आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी बांगलादेश आणि श्रीलंका यांच्याविरोधातील दोन सामन्यांपैकी कोणताही एक सामना जिंकूनही भागणार आहे. जर हे दोन्ही सामने भारत हरला, तर निव्वळ धावगती आणि अन्य समीकरणांवर अवलंबून राहावे लागेल. मात्र हे दोन्ही सामने हरण्याची शक्यता अतिशय कमी असल्याने भारतीय चमूने इंग्लंडविरोधातील सामना हरण्याचा धोका पत्करल्याचे चाहत्यांचे मत आहे.