भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान दोनदा मैदानात दाखल झालेल्या युट्यूबर डॅनियल जार्विस म्हणजेच जार्वो ६९ला मोठी शिक्षा मिळाली आहे. सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी जार्वोवर आजीवन बंदी घालण्यात येणार आहे. लॉर्ड्स आणि हेडिंग्ले कसोटी सामन्यांदरम्यान भारतीय कसोटी जर्सी परिधान करून मैदानात प्रवेश केल्याबद्दल जार्वो चर्चेचा विषय ठरला होता. परंतु यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लब या प्रकरणाला सुरक्षा भंग म्हणून पाहत असून त्याला यापुढे त्याला लीड्स मैदानावर प्रवेश दिला जाणार नाही.

यॉर्कशायर काउंटीच्या प्रवक्त्याने सांगितले, ”डॅनियल जार्विसला हेडिंग्लेकडून आजीवन बंदी घालण्यात येईल. आम्ही आर्थिक दंडही लावू.” असे पेच टाळण्यासाठी काय उपाय केले जातील असे विचारले असता. प्रवक्त्याने सांगितले, की पूर्वीप्रमाणेच, व्यवस्थापक अशा लोकांना रोखण्यासाठी तेथे असतील.

 

 

हेही वाचा – ENG vs IND : अमिताभ बच्चन यांचं जो रूटबद्दलचं जुनं ट्वीट व्हायरल, चाहत्यांनी केली ‘ही’ मागणी

तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या जार्वोला सुरक्षारक्षकांनी धक्के मारत आणि बळजबरीने मैदानाबाहेर काढले. रोहित बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली फलंदाजीला येणे अपेक्षित असतानाच जार्वो हेल्मेट घालून, बॅट घेऊन विशेष म्हणजे तोंडाला मास्क लावून ६९ नंबरच्या जर्सीसहीत फलंदाजीला आला होता.
जार्वोने लॉर्ड्सवर केलेल्या प्रवेशानंतर मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांना त्याच्या या कृत्यामुळे त्यांचे हसू आवरता आले नाही.

 

दुसरीकडे भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे म्हटले होते. कोविड-१९ महामारीत जेव्हा संघ बायो-बबलमध्ये राहत असतात, तेव्हा अशा सुरक्षा उल्लंघनामुळे खेळाडू अस्वस्थ होऊ शकतात. भारतीय संघाने ब्रिटीश चाहत्याविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे की नाही याची माहिती समोर आलेली नाही, परंतु हेडिंग्ले कॅम्पसमध्ये त्याच्या प्रवेशावर बंदी घालण्याच्या यॉर्कशायर काऊंटीचा निर्णय कौतुकास्पद म्हटला जात आहे.