बर्मिंगहॅम कसोटी नंतर भारतीय संघ लॉर्ड्सच्या मैदानावरही पराभूत झाला. फक्त दोन पराभवांमध्ये फरक म्हणजे लॉर्ड्सवरील पराभवात भारताकडून झुंज पाहायला मिळाली नाही. इंग्लिश गोलंदाजांच्या तोफखान्याला तोंड देताना भारतीय संघाच्या अक्षरशः नाकीनऊ आले. इंग्लंडने भारतावर १ डाव आणि १५९ धावांनी मात करत ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

भारताने पहिल्या डावात केवळ १०७ धावा केल्या आणि दुसऱ्या डावात १३० धावा केल्या. जेम्स अँडरसन-स्टुअर्ट ब्रॉड-ख्रिस वोक्स या त्रिकुटाने भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. फक्त हार्दिक पांड्या आणि रविचंद्रन आश्विन यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. त्या व्यतिरिक्त एकही फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर तग धरु शकला नाही. याशिवाय भारतीय गोलंदाजीदेखील फारशी प्रभावी ठरली नाही. याबाबत इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेन याने भारतीय संघावर टीका केली.

भारतीय संघाविरुद्ध इंग्लंडने खेळणे म्हणजे एकाप्रकारे मोठी माणसे विरुद्ध चिल्लर पार्टी असाच सामना आहे, अशी दर्पोक्ती त्याने केली. इंग्लंडचा संघ हा लॉर्डसवरील परिस्थितीत उत्तम खेळ करतोच. पण या खेळपट्टीवर भारतीय संघ कसा खेळतो, याकडे साऱ्यांचे लक्ष होते. मात्र त्यांनी साफ निराशा केली. भारत हा कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे इंग्लंड विरुद्ध भारत ही कसोटी मालिका चुरशीची होईल अशी अपेक्षा होती. पण सध्या पाहता हे सामने म्हणजे मोठी माणसे विरुद्ध छोटी मुले असा सामना दिसून येत आहे, अशी विखारी टीका त्याने केली.