दुसऱ्या वनडेत इंग्लंडने भारताच्या विशाल आव्हानाचा 6 गडी राखून पाठलाग करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. पुण्यात रंगलेल्या या सामन्यात  इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतानेही बटलरच्या निर्णयाचे स्वागत करत 50 षटकात 6 बाद 336 धावा केल्या. टी-20 मलिकेत अपयशी ठरलेल्या केएल राहुलने या सामन्यात दमदार शतक ठोकले. राहुलव्यतिरिक्त विराट कोहली आणि ऋषभ पंतने अर्धशतकी योगदान देत भारताची धावसंख्या तीनशेपार पोहोचवण्यात मदत केली. मात्र, इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, बेन स्टोक्स यांनी भारताच्या गोलंदाजांवर आक्रमण करत 43.3 षटकातच हे आव्हान पूर्ण केले. इंग्लंडकडून 124 धावांची खेळी करणाऱ्या बेअरस्टोला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

इंग्लंडचा डाव

भारताच्या 337 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉयने दमदार सुरुवात केली. 10 षटकात इंग्लंडने बिनबाद 59 धावा केल्या. पहिल्या सामन्याप्रमाणे या दोघांनी समजूतीने खेळ करत संघाला शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. हे दोघे भारताला डोकेदुखी ठरणार, असे वाटत असताना चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवच्या षटकात रॉय धावबाद झाला. त्याने 7 चौकार आणि एका षटकारासह 55 धावांची खेळी केली. रॉय बाद झाल्यानंतर बेन स्टोक्स आणि बेअरस्टो यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. 25 षटकात इंग्लंडने 1 बाद 167 धावांपर्यंत मजल मारली. संघाला दोनशेपार पोहोचवल्यानंतर बेअरस्टोने कुलदीपला षटकार खेचत आपले शतक पू्र्ण केले. बेअरस्टोच्या शतकानंतर बेन स्टोक्सने अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर स्टोक्सने भारतीय गोलंदाजांची धुलाई करण्याल सुरुवात केली. कुलदीप यादवच्या एका षटकात स्टोक्सने सलग तीन षटकार ठोकले. स्टोक्स 99 धावांवर असताना भुवनेश्वर कुमारने त्याला झेलबाद केले. स्टोक्सने 52 चेंडूत 4 चौकार आणि 10 षटकारांची आतषबाजी केली. स्टोक्सनंतर प्रसिध कृष्णाच्या षटकात बेअरस्टोही झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 11 चौकार आणि 7 षटकारांसह 124 धावा ठोकल्या. स्टोक्स आणि बेअरस्टो यांनी 175 धावांची भागीदारी रचली.

या दोघांनंतर फलंदाजीला उतरलेल्या बटलरचा प्रसिध कृष्णाने शून्यावर त्रिफळा उडवला. भारताने इंग्लंडला लागोपाठ तीन हादरे दिले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. लियाम लिव्हिंगस्टोन आणि डेव्हिड मलान यांनी फटकेबाजी करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

भारताचा डाव

नाणेफेक गमावलेल्या भारताकडून रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी सलामी दिली. मागील सामन्यात शतकाच्या जवळ पोहोचलेल्या शिखरकडून या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, तो 17 चेंडूत फक्त 4 धावा काढून बाद झाला. आज खेळण्याची संधी मिळालेल्या रीस टॉप्लेने त्याला बटलरकरवी झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या विराटसोबत रोहितने जम बसवायला सुरुवात केली. मात्र, वैयक्तिक 25 धावांवर असताना तो सॅम करनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी भारताला सांभाळले. या दोघांनी संयमी खेळी करत 23व्या षटकात भारताचे शतक पूर्ण केले.  भन्नाट फॉर्मात असलेल्या विराटने सलग चौथे एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले.  अर्धशतकाचे रुपांतर शतकात करण्यात विराटला पुन्हा अपयश आले. आदिल रशिदने त्याला वैयक्तिक 66 धावांवर तंबूत धाडले. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 1 षटकार लगावला.

विराट बाद झाल्यानंतर ऋषभ पंत आणि लोकेश राहुलने संघाची धावगती वाढवली. पंतने आक्रमक फलंदाजीचा नजराणा पेश करत 28 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्यानंतर राहुलनेही  44व्या षटकात आपल्या शतकाची पायरी ओलांडली. शतक केल्यानंतर राहुलला टॉम करनने माघारी धाडले. राहुलने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 108 धावा ठोकल्या. राहुलनंतर हार्दिक पंड्या आणि पंतने चौफेर फटकेबाजीला सुरुवात केली. वेगवान शतकाकडे कूच करणाऱ्या पंतला टॉम करनने बाद करत इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले. पंतने 40 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांसह 77 धावा फटकावल्या. डावाच्या शेवटच्या षटकात हार्दिक बाद झाला. त्याने 16 चेंडूत 4 षटकार आणि एक चौकारासह 35 धावांची उपयुक्त खेळी केली. इंग्लंडकडून टॉप्ले आणि टॉम करन यांनी 2-2 तर, सॅम करन आणि आदिल रशिदने 1-1 बळी घेतला.

मॉर्गनची मालिकेतून माघार; लिव्हिंगस्टोनला संधी

कर्णधार ईऑन मॉर्गनने दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून माघार घेतली, तर फलंदाज सॅम बिलिंग्स दुसऱ्या सामन्यासाठी अनुपलब्ध होता. परंतु तिसऱ्या सामन्यात त्याच्या खेळण्याची आशा आहे. मॉर्गनच्या अनुपस्थितीत जोस बटलरकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. याशिवाय लियाम लिव्हिंगस्टोनने आज एकदिवसीय पदार्पण केले. इंग्लंडने संघात डेव्हिड मलान आणि रीसी टॉप्लेला संधी दिली होती.

गहुंजे  स्टेडियमवर आज ‘सूर्य’ तळपणार का, याची क्रिकेटजगतात मोठी उत्कंठा निर्माण झाली होती. 360 अंशांमध्ये फटकेबाजी करण्याची क्षमता असलेल्या सूर्यकुमार यादवच्या एकदिवसीय पदार्पणाचीच उत्सुकता होती, मात्र त्याचे पदार्पण लांबणीवर पडले आहे. पहिल्या वनडेत जायबंदी झालेल्या श्रेयस अय्यरच्या जागी ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आले.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, प्रसिध कृष्णा.

इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान,  जेसन रॉय, बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम करन, टॉम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशिद, रीसी टॉप्ले.