News Flash

Video: पहिल्याच चेंडूवर आर्चरला षटकार ठोकण्याची हिंमत कुठून आली?, सूर्यकुमारने सांगितलं ‘सिक्रेट’

"जेव्हा क्रिकेटला सुरूवात केली तेव्हा रबर बॉल, टेनिस बॉलने सिमेंटवर खेळायचो...."

इंग्लंडविरुद्ध गुरूवारी झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यातून सूर्यकुमार यादवने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची धडाक्यात सुरूवात केली. आपल्या दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात विस्फोटक अर्धशतकी खेळी करत त्याने टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सहा चौकार आणि तीन षटकरांची बरसात करत आपल्या पदार्पणाच्या इनिंग्समध्येच सूर्यकुमारने ३१ चेंडूत ५७ धावा ठोकल्या.

कारकिर्दीतील पहिल्या सामन्यात सूर्यकुमारला फलंदाजीची संधी मिळाली नाही, पण गुरूवारी झालेल्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने संधीचं सोनं केलं. विशेष म्हणजे कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर त्याने उत्तुंग षटकार ठोकला, तोही कोणत्या लिंबुटिंबु गोलंदाजाला नव्हे तर, इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाची धुरा ज्याच्या खांद्यावर असते त्या जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर. इंग्लंडच्या सर्वात वेगवान गोलंदाजाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत सूर्यकुमारने आपल्यातील प्रतिभा सर्वांना दाखवून दिली. 143.9kph इतक्या वेगाने आर्चरने सूर्यकुमारला शॉर्ट बॉल टाकला होता. पण पहिल्याच चेंडूवर आपल्यातील ‘३६० डिग्री’ फटक्यांची कला दाखवत सूर्याने बॅकफूटवरुनच तो चेंडू सीमारेषेपार षटकारासाठी भिरकावला. शानदार कामगिरीसाठी सूर्यकुमारला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याने सूर्यकुमार यादवची एक विशेष मुलाखत घेतली. बीसीसीआयने या मुलाखतीचा व्हिडिओही ट्विटरद्वारे शेअर केला आहे.

या मुलाखतीत, जोफ्रा आर्चरसारख्या गोलंदाजाला पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याची हिंमत कशी आली? असा प्रश्न शार्दुल ठाकूरने सूर्यकुमारला विचारला. त्यावर सूर्यकुमार यादवने, “मी जोफ्राची गोलंदाजी नेहमी बघत आलोय…आयपीएलमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हाही नवीन फलंदाज मैदानावर येतो, तेव्हा त्याला बॅकफूटवर ढकलण्याचा त्याचा प्रयत्न असतो. मी त्याच्याविरोधात २-३ वर्षांपासून आयपीएल खेळतोय, त्यामुळे मला त्याबाबत कल्पना होती…तो शॉट मी खूप आधीपासून खेळत आलोय…लोकल क्रिकेट, डोमेस्टिक क्रिकेट…जेव्हा क्रिकेटला सुरूवात केली तेव्हा रबर बॉल, टेनिस बॉलने सिमेंटवर खेळायचो, तिथूनच आपोआप तो शॉट डेव्हलप झाला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पोहोचला”, असं सूर्यकुमारने सांगितलं.


दरम्यान, भारत-इंग्लंड यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिका अपेक्षेप्रमाणे उत्कंठावर्धक तसेच चाहत्यांचे मनोरंजन करणारी ठरली असून आज (दि.२०) या मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना होणार आहे. पाच सामन्यांची ही मालिका आता २-२ अशा बरोबरीवर असल्याने शनिवारी होणाऱ्या निर्णायक लढतीत यश संपादन करून कोणता संघ मालिकेवरही कब्जा करणार, हे पाहणे रंजक ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 1:12 pm

Web Title: india vs england suryakumar yadav reveals how he executed his first ball six off jofra archer in 4th t20i sas 89
टॅग : Ind Vs Eng
Next Stories
1 Ind vs Eng : ‘स्पेशलिस्ट’ गोलंदाज परतला, निर्णायक सामन्याआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी
2 लक्ष्यचे आव्हान संपुष्टात
3 आज निर्णायक झुंज!
Just Now!
X