लीड्स : भक्कम सुरुवात झाल्यानंतर त्यास पूरक साथ देण्यासाठी मधल्या फळीतील फलंदाजांवर मोठी जबाबदारी असते. मात्र त्याच्या अभावामुळेच भारतास इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पराभवास सामोरे जावे लागले होते. ही समस्या भारतीय संघ मंगळवारी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात कशी दूर करतो, याचीच उत्सुकता आहे.

ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेतील विजयापाठोपाठ एकदिवसीय सामन्यांची मालिकाही जिंकण्यासाठी भारताचा कर्णधार विराट कोहली प्रयत्न करील अशी अपेक्षा आहे. उभय संघांमधील कसोटी मालिकेस १ ऑगस्ट रोजी सुरुवात होत आहे. त्यापूर्वी एकदिवसीय मालिका जिंकल्यास भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावणे महत्त्वाचे आहे.

भारताच्या गोलंदाजीची मुख्य मदार भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव यांच्यावर आहे. फलंदाजीत रोहित शर्मा, कोहली, शिखर धवन, के.एल.राहुल व हार्दिक पंडय़ा यांच्यावर भारताची भिस्त आहे. मात्र, दुसऱ्या सामन्यात भारताची फलंदाजी ढेपाळल्याने मोठय़ा फरकाने  पराभवाची नामुष्की सहन  करावी लागली होती.

दुसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत ठेवल्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, जो रुट, डेव्हिड विली यांच्याकडून त्यांना चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे. गोलंदाजीत लिआम प्लंकेट, स्टोक्स, मार्क वुड, विली यांच्यावर त्यांच्या आशा आहेत.

सामन्याची वेळ : सायंकाळी ५ वाजता

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३