दुसऱ्या टी-२० सामन्यातून दमदार पुनरागमन केलेली ‘विराटसेना’ आज इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी सज्ज झाली आहे. आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर उभय संघात पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेचा तिसरा सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला इंग्लंडने सहज मात दिली होती. त्यानंतरच्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या इशान किशन आणि कर्णधार विराट कोहली यांच्या अर्धशतकी खेळींमुळे भारताने इंग्लंडवर सात गड्यांनी सरशी साधली. गुजरातमध्येही करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मालिकेचे उर्वरित तीन सामने प्रेक्षकांशिवाय खेळले जाणार असल्याची घोषणा करण्यात आल्याने या समान्यामध्ये मैदानात प्रेक्षक नसतील.

आयपीएल गाजवलेल्या सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी दुसर्‍या टी-२० सामन्यात पदार्पण कले. या सामन्यात सूर्यकुमारला फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण, ‘छोटा पॉकेट बडा धमाका’ म्हणून ओळख असलेल्या किशनने इंग्लंडच्या स्टार गोलंदाजांची धुलाई केली. त्यामुळे या दोघांनाही तिसऱ्या सामन्यात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. शिवाय, भारताच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली असल्याने विराट संघात कोणताही बदल करणार नाही असे समजते.

दुसरीकडे, इंग्लंडचा संघ दुसऱ्या सामन्यात फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकला नाही. शिवाय, त्यांचे गोलंदाजही दुसऱ्या टी-२० सामन्यात अपयशी ठरले. सॅम करन आणि जोफ्रा आर्चर यांनी धावांवर लगाम घातला. मात्र, त्यांना जास्त बळी घेण्यात अपयश आले. दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या संघातील वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनच्या २.५ षटकात ३८ धावा कुटल्या. त्यामुळे कर्णधार इयान मॉर्गन संघात कोणता बदल करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्या सामन्याप्रमाणे पुन्हा दमदार कामगिरी करून मालिकेत २-१ अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न पाहुण्या संघाचा असेल. तर विराटसेना मालिका विजय सुखकर करण्याच्या दृष्टीने हा सामना खिशात घालण्याच्या उद्देशानेच मैदानावर उतरेल.

खेळपट्टी आणि हवामान –
तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करू शकते. आतापर्यंत मालिकेत दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा झाला आहे. मात्र, या सामन्यात चित्र पालटू शकते. खेळपट्टीवर लाल माती असल्याने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेणे, हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

संभाव्य संघ
भारत –
इशान किशन, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार.

इंग्लंड –
जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक), डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो, इयान मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, सॅम करन, आदिल रशिद, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन आणि टॉम करन.

सामन्याची वेळ –
सायंकाळी सात वाजल्यापासून, स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर