तिसऱ्या टी-२० सामन्यामध्ये विजयासाठी १५७ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडला पहिला धक्का बसला आहे. ९ धावांवर जेसन रॉयला युजवेंद्र चहलनं रोहित शर्माकडे झेल देण्यास भाग पाडलं. युजवेंद्र चहलच्या पहिल्याच ओव्हरमध्ये बटलरनं षटकार खेचून त्याचं स्वागत केलं. मात्र, ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर चहलनं धोकादायक जेसन रॉयला माघारी धाडलं.

दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये टीम इंडियाने पाहुण्या इंग्लंडला पराभवाची धूळ चारल्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय फलंजाजी साहेबांच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवणार अशी अपेक्षा चाहत्यांना होती. मात्र, टॉस जिंकून इंग्लंडनं गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाची दाणादाण उडाली. दुसऱ्या सामन्यात शेर वाटणारी टीम इंडियाची टॉप ऑर्डर तिसऱ्या सामन्यात कोसळली. के. एल. राहुल आणि रोहित शर्मा स्वस्तात माघारी गेल्यानंतर विराट कोहलीवर सगळी मदार आली. दुसऱ्या बाजूने फलंदाज माघारी जात असताना विराट कोहलीनं एक बाजू नेटानं लावून धरली आणि आपलं तडाखेबाज अर्धशतक पूर्ण केलं. कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियानं इंग्लंडसमोर विजयासाठी १५७ धावांचं आव्हान ठेवलं आहे.

बऱ्याच चर्चेनंतर टीममध्ये दाखल झालेला सलामीवीर रोहित शर्मा इशान किशनच्या जागेवर राहुलसोबत सलामीला आला. एका बाजूने त्याने आश्वासक सुरुवात केली असताना दुसरीकडे के. एल. राहुल वुडच्या चेंडूचा शिकार ठरला आणि क्लीन बोल्ड होऊन शून्य धावांवर माघारी परतला. त्या पाठोपाठ रोहित शर्मा (१५) देखील वुडच्याच गोलंदाजीवर जोफ्रा आर्चरकडे झेल देऊन बाद झाला. हे कमी म्हणून की काय, दुसऱ्या सामन्यात तुफान अर्धशतक झळकावून दमदार पदार्पण करणारा इशान किशन देखील फक्त ४ धावा करून जॉर्डनला चुकीचा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. यावेळी भारताची अवस्था ३ बाद २४ अशी झाली होती.

इशान बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं सगळी धुरा आपल्या खांद्यावर घेतली. समोरून रिषभ पंतनं कोहलीला चांगली साथ देत भागीदारी रचून भारताच्या डावाला आकार द्यायला सुरुवात केली. मात्र, विराट कोहलीच्या चुकीच्या कॉलवर रिषभ पंत २५ धावांवर रनआऊट झाला आणि पुन्हा भारताचा डाव गडगडला. पंतपाठोपाठ श्रेयस अय्यरनं देखील ९ धावांवर बाद होत पॅव्हेलियनचा रस्ता धरला. मात्र, एका बाजूने विराट कोहलीनं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करतानाच संघाचा धावफलक देखील हलता ठेवला. परिणामी भारतानं २० ओव्हर्समध्ये ६ गड्यांच्या मोबदल्यात १५६ धावा केल्या.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत आणि इंग्लंड संघात तिसरा टी-20 सामना खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात रोहित शर्माला सूर्यकुमार यादवच्या बदली स्थान देण्यात आले आहे. तर, इंग्लंडने टॉम करनऐवजी मार्क वूडला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

सूर्यकुमार यादवला डच्चू

या सामन्यापूर्वी धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा संघात परतण्याची  दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, कोणत्या खेळाडूला बसवणार याचे चित्र स्पष्ट नव्हते. लोकेश राहुल मागच्या सामन्यात शू्न्यावर बाद झाल्याने तो संघाबाहेर बसेल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, कर्णधार विराट कोहलीने राहुलला अजून एक संधी दिली आहे. मागील सामन्यात पदार्पण केलेल्या सूर्यकुमारला फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्यामुळे या सामन्यातून त्याची खेळी पाहण्यासाठी नेटकरी आतूर झाले होते. मात्र, सूर्यकुमारला डच्चू मिळाल्याने चाहते आता निराश झाले आहेत.

प्लेईंग XI –
भारत –
इशान किशन, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार.

इंग्लंड –
जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक), डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो, इयान मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, सॅम करन, आदिल रशिद, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन आणि मार्क वूड.