यंदाच्या विश्वचषकाला ऑस्ट्रेलिया-इंग्लंड लढतीनेच प्रारंभ होणार आहे. रविवारी या दोन परंपरागत प्रतिस्पध्र्यामध्ये होणाऱ्या तिरंगी क्रिकेट स्पध्रेचा अंतिम सामना म्हणजे त्याची रंगीत तालीमच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
चार सामन्यांत १५ गुणांची कमाई करीत अंतिम फेरीत स्थान मिळवणारा जॉर्ज बेलीच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा संघ निर्विवादपणे जेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन तंदुरुस्त झाल्यामुळे ‘वाका’वर ऑस्ट्रेलियाला रोखणे आव्हानात्मक ठरू शकेल. दुखापतीतून सावरत असलेल्या मायकेल क्लार्कच्या अनुपस्थितीतही ऑस्ट्रेलियाची फलंदाजी आणि गोलंदाजीची फळी समर्थपणे खेळत आहे.
ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ विश्वचषकाच्या पाश्र्वभूमीवर सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. शुक्रवारी या संघाने भारताला हरवून त्यांचे आव्हान संपुष्टात आणले. जेम्स अँडरसन आणि स्टीव्ह फिन यांच्यावर इंग्लंडची गोलंदाजीची मदार असेल.