दुसऱ्या सामन्यात आपल्या संथ खेळामुळे टीकेचा विषय बनलेल्या महेंद्रसिंह धोनीसाठी कर्णधार विराट कोहली धावून आला आहे. धोनीवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. एका वाईट खेळीनंतर लोकं धोनीबद्दल लगेचं वाईट बोलायला लागतात, पण क्रिकेटमध्ये सर्व दिवस तुमचे नसतात. एखाद्या दिवशी तुमचा खेळ मनासारखा होत नाही. पण अशाही परिस्थितीत धोनीच्या अनुभवावर आमचा पूर्ण विश्वास असल्याचं कोहली म्हणाला.

दुसऱ्या सामन्यादरम्यान विराट आणि सुरेश रैनाची जोडी माघारी परतल्यानंतर धोनी फलंदाजीसाठी मैदानात आला. मात्र ज्या षटकांमध्ये भारताला धावगती वाढवण्याची गरज होती तिकडे धोनीने सावध पवित्रा घेतला. धोनीने आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण केला, मात्र यासाठी त्याने तब्बल ५९ चेंडू खर्ची घातले. दुसऱ्या सामन्यात धोनीने केवळ ३७ धावा केल्या. त्याच्या या संथ खेळीनंतर मैदानात प्रेक्षकांनीही धोनीची हुर्यो उडवून नाराजी व्यक्त केली.

अवश्य वाचा – धोनीच्या विक्रमाला वादाची किनार, संथ खेळामुळे मैदानात प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त

सामना संपल्यानंतर पारितोषीक वितरण समारंभात धोनीच्या खेळाबद्दल प्रश्न विचारला असता कोहलीने धोनीचं समर्थन केलं. “ज्यावेळी धोनी चांगली फलंदाजी करत नाही तेव्हा त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. एका खेळीवरुन लोकं लगेच निष्कर्षापर्यंत येऊन पोहचतात हे योग्य नाही. ज्यावेळी धोनी मैदानात आक्रमक खेळतो तेव्हा लोकं त्याला सर्वोत्तम फिनीशर म्हणतात. मात्र एखाद्या सामन्यात त्याची फलंदाजी नेहमीसारखी झाली नाही की त्याच्यावर टीका का होते?” क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस हा तुमचा नसतो, त्यामुळे धोनीच्या अनुभवावर व खेळावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे.