पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड यांनी पुन्हा एकदा भारताचा कर्णधार विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. पंचांसोबत वाद घालण्यावरुन लॉयड यांनी विराटवर टीका केलीये. विराट पंचांचा अनादर करतो आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा भारतीय कर्णधार पंचांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतो, असं ते म्हणाले.

विराट कोहलीने अलिकडेच इंग्लंडविरोधात झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यानंतर सॉफ्ट सिग्नलच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. सूर्यकुमार यादवचा झेल इंग्लंडच्या डेविड मलानने पकडला, त्यावेळी चेंडू जमिनीला स्पर्श करत असल्याचं रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होतं. पण तिसऱ्या पंचांनी ठोस पुरावा नसल्याचं सांगत सॉफ्ट सिग्नलच्या आधारे सूर्यकुमारला बाद दिलं. त्यावरुन बोलताना विराटने, “जर खेळाडूला स्वतःला माहित नाहीये की त्याने कॅच पकडला आहे की नाही, तर मैदानावरील पंच आउट असा सॉफ्ट सिग्नल कसा देऊ शकतात…सॉफ्ट सिग्नल निर्णायकच का हवा…मला कळत नाही की मैदानावरील पंच सॉफ्ट सिग्नल देताना मला माहित नाही (I Don’t Know) असं का नाही सांगू शकत”, अशी टीका विराटने केली होती. त्यावरुनच डेविड लॉयड यांनी विराटवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

आणखी वाचा- जायबंदी झाल्यामुळे हा ‘कॅप्टन’ IPL ला मुकणार?, संघाला मोठा धक्का

“चौथ्या टी-२०मध्ये डेविड मलानने कॅच पकडल्यानंतर इंग्लंडने पंचांवर सॉफ्ट सिग्नल आउट असा देण्यासाठी दबाव टाकल्याचं विराटला वाटतं. पहिले तर हे समजून घ्या की, मैदानावरील पंचांना जास्तीत जास्त अधिकार मिळावा यासाठी सॉफ्ट सिग्नलचा नियम आहे…आणि इंग्लंडने अहमदाबादमध्ये नितिन मेनन (अंपायर) यांच्यावर दबाव टाकला की माहित नाही, पण एक गोष्ट चांगली माहितीये की, कोहली या संपूर्ण दौर्‍यामध्ये पंचांवर दबाव आणतोय आणि त्यांचा अनादर करत आहे”, असं लॉयड यांनी डेली मेलसाठी आपल्या स्तंभात लिहिलं आहे.

आणखी वाचा- Ind vs Eng : दुसऱ्या वनडेमध्ये सूर्यकुमार यादवला मिळणार संधी? श्रेयस अय्यर झाला जायबंदी

दरम्यान, चेन्नईत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर ३१७ धावांनी शानदार विजय मिळवला होता. त्या सामन्यात विराटचा मैदानावरील अंपायर नितिन मेनन यांच्यासोबत वाद झाला होता. त्यावेळीही डेव्हिड लॉयड यांनी कोहलीवर एका कसोटी सामन्याची बंदी घालण्याची मागणी केली होती.