भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारपासून सुरू झाला. दिवस-रात्र पद्धतीचा असलेला हा सामना गुलाबी चेंडूने खेळवण्यात येत आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना खेळला जात आहे. या सामन्याला देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उपस्थितीत असल्याने हा सामना खास ठरला. तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. भारतीय फिरकीपटूंच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ ११२ धावांत बाद झाला.

विराट कोहली आणि जो रुट यांच्यातील नाणेफेकीची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीवर नजर फिरवूयात. कसोटीमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रुट यानं विराट कोहलीपेक्षा जास्तवेळा नाणेफेक जिंकली आहे. जो रुट याची नाणेफेक जिंकण्याची टक्केवारी ५९.२ इतकी आहे. विराट कोहलीनं ४७.७ टक्के इतक्यांदा नाणेफेक जिंकली आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर सामने जिंकण्याची टक्केवारी विराट कोहलीची सरस आहे. विराट कोहलीनं नाणेफेक जिंकल्यानंतर ८१.५ टक्के सामने जिंकले आहेत. तर जो रुट यानं नाणेफेक जिंकल्यानंतर ६०.७ टक्के सामन्यात बाजी मारली आहे. नाणेफक जिंकल्यानंतरही पराभवाची टक्केवारी जो रुट याची जास्त आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर विराट कोहलीला १८.५ टक्के पराभव स्विकारावा लागला आहे. तर जो रुट याला ३९.३ टक्के पराभवाची चव चाखावी लागली आहे. नाणेफेक गमावल्यानंतर विराट कोहलीनं ३८.७ टक्के सामने गमावले आहेत. तर जो रुट यानं ४५ टक्के सामन्यात पराभव स्वीकारला आहे.