News Flash

Ind vs Eng : दुसऱ्या सामन्यात हार्दिक पांड्याला का नाही दिली गोलंदाजी? विराट म्हणतो…

टीम इंडियाच्या पाचही गोलंदाजांनी इंग्रज फलंदाजांसमोर गुडघे टेकल्याचं दिसत असतानाही कोहलीने हार्दिक पांड्याला नाही दिली गोलंदाजी

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला इंग्लंडकरुन ६ विकेट्सनी दारुण पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने दिलेले ३३७ धावांचे विशाल आव्हान इंग्लंडने जॉनी बेअरस्टोच्या शानदार शतकासह बेन स्टोक्स आणि जेसन रॉयच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर फक्त चार फलंदाजांच्या मोबदल्यात आणि ३९ चेंडू राखून पार केले आणि दिमाखदार विजय साजरा केला.

या सामन्यात भारतीय संघाच्या पाचही गोलंदाजांनी इंग्रज फलंदाजांसमोर गुडघे टेकल्याचं बघायला मिळालं. तरीही कर्णधार विराट कोहलीने सहावा गोलंदाज म्हणून हार्दिक पांड्याकडे चेंडू सोपवला नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसह अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंच्याही भुवया उंचावल्या. सामना संपल्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशनमध्येही कोहलीला पांड्याला गोलंदाजी न देण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर, येत्या काही महिन्यात भारतीय संघाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे हार्दिकला गोलंदाजी न देण्याचा निर्णय घेतल्याचं विराटने सांगितलं. “आम्ही टी-२० मालिकेत त्याच्या गोलंदाजीचा वापर केला, पण हे थोडंफार वर्कलोड मॅनेजमेंटप्रमाणे आहे. हार्दिक आमच्या संघातील मह्त्त्वाचा भाग आहे, त्यामुळे त्याच्या फिटनेसची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. फलंदाजीसोबतच त्याच्या गोलंदाजीतील कौशल्याची कुठे गरज आहे हे समजून घेणं गरजेचं आहे”, असं कोहली म्हणाला.

दरम्यान, सूर्यकुमार यादवला संधी न मिळाल्यामुळे गहुंजेत ‘सूर्य’ तळपण्याची आशा फोल ठरली. परंतु शुक्रवारी धावांचा मुसळधार पाऊस क्रिकेटरसिकांना अनुभवता आला. या पावसात भारताची होरपळ झाली. इंग्लंडने दुसरा सामना सहा गडी राखून जिंकत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

के. एल. राहुलच्या (१०८) शानदार शतकी खेळीला कर्णधार विराट कोहलीच्या संयमी आणि ऋषभ पंतच्या आक्रमक अर्धशतकांची साथ लाभल्यामुळे भारताने ६ बाद ३३६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. पण जॉनी बेअरस्टोच्या शतकासह बेन स्टोक्स आणि जेसन रॉयच्या अर्धशतकांमुळे इंग्लंडने चार फलंदाजांच्या मोबदल्यात ३९ चेंडू राखून दिमाखदार विजय साजरा केला.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर सलामीवीर शिखर धवन (४) आणि रोहित शर्मा (२५) लवकर बाद झाल्यामुळे भारताची २ बाद ३७ अशी अवस्था झाली. परंतु राहुलने एकदिवसीय कारकीर्दीतील पाचवे शतक साकारताना सात चौकार आणि दोन षटकारांसह ११४ चेंडूंत १०८ धावा केल्या. कोहलीने तीन चौकार आणि एक षटकारासह ७९ चेंडूंत ६६ धावा केल्या. कोहली आणि राहुल जोडीने तिसऱ्या गड्यासाठी १२१ धावांची बहुमोल भागीदारी केली. आदिल रशीदने कोहलीचा अडसर दूर केल्यानंतर राहुलने पंतच्या साथीने चौथ्या गड्यासाठी ११३ धावांची भागीदारी केली.

श्रेयस अय्यरच्या जागी संघात स्थान मिळालेल्या डावखुऱ्या पंतने दडपण झुगारत इंग्लंडच्या गोलंदाजांवर त्वेषाने हल्ला चढवला. त्याने बेन स्टोक्सच्या ४१व्या षटकात दोन सलग षटकारांची अदाकारी पेश करताना फक्त २८ चेंडूंत कारकीर्दीतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याने सात षटकार आणि तीन चौकारांसह ४० चेंडूंत ७७ धावा केल्या. राहुल बाद झाल्यानंतर पंतच्या साथीला आलेल्या हार्दिक पंड्यानेही पंतचा आक्रमणाचा कित्ता गिरवला. हार्दिकने १६ चेंडूंत एक चौकार आणि चार षटकारांसह ३५ धावा केल्या. पंत-हार्दिक जोडीच्या फटके बाजीमुळे भारताला अखेरच्या १० षटकांत १२६ धावा करता आल्या.

त्यानंतर, इंग्लंडच्या डावात रॉय आणि बेअरस्टो यांनी ११० धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. रोहित शर्माच्या चपळाईने रॉय धावचीत झाल्यावर बेअरस्टोच्या साथीला स्टोक्स येताच धावांचा वेग वाढला. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी ११७ चेंडूंत १७५ धावांची भागीदारी करीत विजय आवाक्यात आणला. स्टोक्सने भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करीत त्यांची लय बिघडवली. मागील सामन्यात ९४ धावांवर बाद झाल्यामुळे शतक हुकलेल्या बेअरस्टोने (११२ चेंडूंत ११ चौकार आणि ७ षटकारांसह १२४ धावा) दुसऱ्या सामन्यात मात्र कारकीर्दीतील ११वे शतक साकारले. परंतु स्टोक्सला (५२ चेंडूंत ४ चौकार आणि १० षटकारांसह ९९ धावा) शतकाने हुलकावणी दिली. भुवनेश्वरने स्टोक्सला बाद करीत ही जोडी फोडली. पाठोपाठ बेअरस्टो आणि कर्णधार जोस बटलर (०) बाद झाल्यामुळे इंग्लंडची ४ बाद २८७ अशी स्थिती झाली. पण तोवर उशीर झाला होता. डेव्हिड मलान (१६*) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (२७*) यांनी इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताकडून कुलदीप यादव (१० षटकांत ८४ धावा) आणि कृणाल पंड्या (६ षटकांत ७२ धावा) महागडे ठरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 10:08 am

Web Title: india vs england virat kohli reveals why hardik pandya didnt bowl in 2nd odi against england sas 89
टॅग : Ind Vs Eng
Next Stories
1 आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेतील सामने नवी मुंबईत
2 तेजस्विनी-संजीव यांना सुवर्णपदक
3 सायना उपांत्य फेरीत
Just Now!
X